बुधवार, २ डिसेंबर, २०२०

डॉ. राजेंद्रप्रसाद जन्मदिन

 डॉ. राजेंद्रप्रसाद जन्मदिन

 (जन्म ३ डिसेंबर १८८४–

मृत्यू २८ फेब्रुवारी १९६३). 

           भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर नेते आणि भारतीय प्रजासत्तकाचे पहिले राष्ट्रपती (१९५०–६२).



पं. जवाहरलाल नेहरूंनी २ सप्टेंबर १९४६ रोजी हंगामी सरकार बनविले. या राष्ट्रीय मंत्रीमंडळात अन्नमंत्री म्हणून राजेंद्रबाबूंचा समावेश झाला. त्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती स्थापण्यात आली व राजेंद्रप्रसाद यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड झाली. या समितीने सु. तीन वर्षांच्या परिश्रमानंतर भारताची राज्यघटना मंजूर केली. त्यानुसार प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्रबाबूंचा शपथविधी झाला (१९५०). त्यांनी आपले वेतन कमी करून घेतले आणि राष्ट्रपती भवनातील शाही राहणीमानात आमूलाग्र बदल केला. तेथील विशाल उद्यान जनतेसाठी खुले केले. पूर्वीप्रमाणेच ते साधेपणाने रहात. या पदावर ते निवृत्त होईपर्यंत म्हणजे १० मे १९६२ पर्यंत होते. त्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रपतींचे घटनात्मक स्थान व अधिकार यांविषयीचा प्रश्न दोन तीन वेळा उद्भवला.

         प्रथम राष्ट्रपती झाल्यावर १९५० मध्ये त्यांनी पंतप्रधानांना एक टिपण पाठवून राष्ट्रपतींना विशेषाधिकार आहेत काय, हा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळचे महान्यायवादी सेटलवाड यांनी या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिले नंतर १९५१ मध्ये हिंदू कोड बिल हे हिंदू व्यक्तिगत कायद्यात बदल करणारे विधेयक मांडले गेले तेव्हाही त्यांनी त्या वेळच्या संसदेस एवढे महत्त्वाचे विधेयक विचारात घेण्याचा अधिकार नाही, या कारणास्तव प्रस्तावित विधेयकाविरुद्ध मत नोंदवून आपण संसदेला संदेश पाठवू, असा मनोदय व्यक्त केला होता. विशेषतः हिंदू धर्म आणि परंपरा यांविषयींचा त्यांचा दृष्टिकोन सौम्य आणि परंपरेचा अभिमान बाळगणारा असल्याने ते ह्या विधेयकावर नाराज होते. पुढे १९६० साली त्यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे राष्ट्रपतींच्या घटनात्मक स्थानाची चर्चा व्हावी असे सुचविले, या व अन्य कारणांनी पंतप्रधान नेहरूंशी त्यांचे तात्विक मतभेद झाले मात्र त्यांच्या व्यक्तिगत मैत्रीत व स्नेहसंबंधात बाधा आली नाही. निवृत्तीनंतर ते बिहारमधील आपल्या सदाकत आश्रमात (पाटणा) राहण्यास गेले. आईसमान असलेली त्यांची मोठी विधवा बहिण भगवती देवी हिचे निधन (१९६०) झाले व संधिवाताने त्यांच्या पत्नीचे निधन झाले (१९६२). यांमुळें ते खचले. शिवाय त्यांचा दम्याचा विकार तीव्रतर झाला. त्यातच पाटण्यात त्यांचे निधन झाले.

           त्यांचे खासगी जीवन अत्यंत साधे व पारंपरिक पद्धतीचे होते. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांचा विवाह राजबंसदेवी यांच्याबरोबर झाला (१८९७). त्यांना मृत्यूंजय व धनंजय असे दोन मुलगे झाले. त्यांच्या घरची सर्व आर्थिक जबाबदारी मोठे भाऊ महेंद्रप्रसाद सांभाळत असत.

         राजेंद्रबाबूंना अनेक मान सन्मान मिळाले. भारतातील अलाहाबाद, पाटणा, सागर, म्हैसूर, दिल्ली, काशी इ. विद्यापीठांनी डि. लीट्. ही सन्मान्य पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. भारत सरकारने भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांच्या देशसेवेचा बहुमान केला (१९६२).

            राजेंद्रबाबूंचे व्यक्तिमत्त्व सर्वस्पर्शी आणि विशाल होते ते. धर्मनिष्ठ व परंपराभिमानी होते. पण रूढीप्रिय नव्हते. काळाच्या ओघाबरोबर आपले रीतिरिवाज बदलले पाहिजेत व समतेवर व माणुसकीवर आधारित नवसमाजाची घडण झाली पाहिजे, या मताचे ते होते. नेहरूंच्या समाजवादी विचारांपासून ते दूरच राहिले. त्यांच्यावर म. गांधींची धोरणे व मूल्ये यांचा खोलवर प्रभाव होता. सौजन्य, विद्वत्ता, आणि कार्यनिष्ठता यांमुळे ते सामान्यांत अत्यंत लोकप्रिय झाले. यांमुळेच म. गांधी त्यांना ‘अजातशत्रू’ म्हणत.

संकलक 

राजेंद्र पवार

मोबा ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...