बुधवार, २ डिसेंबर, २०२०

!! बोराटे उद्योग समूहास भेट !!


बोराटे उद्योग समूहास भेट 



          कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावचे सदाशिव बोराटे महाराष्ट्रातील  नामवंत उद्योजक  झाले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.
          आज त्यांच्या सातारा येथील उद्योगास भेट देण्याचा योग आला. चित्रपट निर्माते मानसिंग पवार, बाळासाहेब निकम व मी असे तिघेजण त्यांच्या भेटीस गेलो होतो.
             बोराटेसाहेबांचे प्राथमिक, माध्यमिक  तसेच महाविद्यालयीन शिक्षण अतिशय संघर्षात गेले. त्याकाळी शिक्षणासाठी  ग्रामीण भागातील सगळ्यांनाच संघर्ष करावा लागत होता. संघर्षाचा जरा जास्तच वाटा सदाशिव बोराटे यांच्या वाट्याला आला. या संघर्षातून पुढील उद्योजकतेची बीजे पेरली गेली. ते एम.एस.सी झाले. त्यावेळी ते सहजच प्राध्यापक झाले असते. पण उद्योजक बनण्याचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातूनच एलिट प्लॅस्टिक  इंडस्ट्रीची निर्मिती झाली. उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने सुरुवातीला खूपच त्रास झाला.जर कष्ट प्रामाणिक असतील तर यश येतेच, अगदी तसचं बोराटे साहेबांच्या बाबतीत घडले.
          आज त्यांच्या सहा कंपन्या आहेत. जवळपास ४५० कामगार त्यामध्ये काम करत आहेत. बहुतांशी महिला कामगार आहेत. महिलांच्या हाताला काम तर मिळालेच पण याठिकाणी महिला शक्तीचा गौरव झाल्याचे दिसून आले. आम्ही कंपनीमध्ये फेरफटका मारत असताना प्रत्येक कामगार आपल्या कामात व्यस्त असलेला दिसून आला.
             सातारा येथे युवराज प्लॅस्टिक इंडस्ट्री,बोराटे प्लॅस्टिक पॅक इंडस्ट्रीज, वांगना प्लॅस्टिक, पुणे (भोसरी) येथे एलिट प्लॅस्टिक इंडस्ट्रीज आणि चाकण येथे दोन एकरावर एलिट प्लॅस्टिक इंडस्ट्रीजचा भव्य प्रकल्प उभा राहिला आहे. बोराटे साहेबांना सर्वजण आदराने अण्णा म्हणतात. अण्णांचा एकच मंत्र आहे. "कर्म हीच पूजा", ते खरे सावता महाराजांचे वंशज वाटतात. त्यांनी आपल्या गावात सावता महाराजांचे मंदिर उभारले आहे.
आपलं काम करत असताना परमेश्वराचे नामस्मरण करा.
'कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’'
’'लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’
अनासक्त वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच  सावता महाराजांची जीवननिष्ठा होती.
प्रपंच करताना सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. आपले काम निष्ठापूर्वक केले तर परमेश्वर भेटतो.  अगदी सावता महाराजांची विचारप्रणाली
अण्णा तंतोतंत जगत आहेत यात तिळमात्र शंका नाही असेच मला वाटते.
           बोराटे साहेबांचा गावातील सामाजिक कामातही  मोलाचा वाटा असतो, मग ती प्राथमिक शाळा असो, अगर माध्यमिक शाळा असो अगर कोणतेही सामाजिक काम असो. बोराटे साहेबांनी वर्णे येथील माध्यमिक शाळेलाही आर्थिक मदत केली आहे त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोतच.
     अण्णा हे अतिशय विनयशील व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या मुलांनाही त्यांनी उच्च विद्याविभूषित केले आहे. त्यांचा मुलगा युवराज बी.ई. असून सध्या या उद्योगाची धुरा सांभाळत आहे. बोराटे साहेबांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली पण त्याचा वटवृक्ष करण्याचे काम त्यांच्या मुलांनी केले. 

             कोणत्याही यशस्वी पुरुषापाठीमागे स्त्रीचा हात असतो अगदी त्याप्रमाणे  पूर्वाश्रमीच्या शिक्षिका असणाऱ्या सौ. रत्नमाला बोराटे यांनी बोराटे साहेबांना अडचणीच्या काळात साथ दिली.  साहेबांना तीन मुली असून त्याही उच्चशिक्षित  आहेत. त्यांची मुलगी शुभांगी नायकवडी हिने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनचा डिप्लोमा केला आहे, सुुषमा भोसले एम. कॉम. डी. बी. एम. तर दीपाली फुलसुंदर बी. ई. एम. बी. ए. आहे.त्यांची सून सौ.गार्गी बोराटे बी. ई. एम. बी.ए. असून एच. आर. विभाग सांभाळत आहे. थोडक्यात उद्योगाच्या विस्ताराचे श्रेय दुसऱ्या पिढीलाच जाते. मुलीही कंपनी व्यवस्थापनात मोलाची मदत करत आहेत. आपल्या मुलाबरोबर पुतण्याला व्यवसायात सक्षम केले आहे. त्यालाही उद्योजक बनवले आहे.
      संघर्षातूनच माणसाची प्रगती होते. प्रचंड इच्छाशक्ती,कष्ट करण्याची धडपड, नवनिर्मितीचा ध्यास माणसाला यशोशिखरावर घेऊन जातो. अण्णांच्यात हे गुण खचाखच भरले आहेत.  महाराष्ट्रात उद्योगाला पोषक वातावरण निर्माण होत आहे त्याचा लाभही तरुणांनी घेतला पाहिजे. बोराटे साहेब ही एक धगधगती मशाल आहे. तरुणांनी आपल्या उद्योजकतेच्या मशाली प्रज्वलित कराव्यात,उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्वल करावे, अण्णांचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील तरुण उद्योजक होतील असे मला वाटते.
बोराटे उद्योगसमूहाच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
            राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८
     

२ टिप्पण्या:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...