मंगळवार, ३ मार्च, २०२०

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा ११!!

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा ११!!
            आजचे किर्तन ह.भ.प.श्री.बंडातात्या कराडकर यांचे झाले होते. त्यांनी किर्तनसेवेसाठी संत चोखोबाराय यांचा अभंग घेतला होता. तो पुढीलप्रमाणे-
 आजी दिवस धन्य सोनियाचा। जिवलग विठोबाचा भेटलासे ।१।
 तेणे  सुख समाधान लागे  विश्रांती । तुझे नाठविशी चित्ती काही।धृ।
चोखा म्हणे आनंद वाटलासे जिवा ।संतांचे पाय केशवा  भेटीयेले।२।
                अभंगाचे निरुपण सांगण्यापूर्वी तात्यांच्या बद्दल थोडीशी माहिती सांगणे आवश्यक आहे असे मला वाटते. वारकरी संप्रदाय अधिक गतिमान करणे,या समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करणे. व्यसनमुक्त समाज घडवणे. तरुणांचे संघटन करणे.हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणे या गोष्टी तात्या करत आहेत.




                    तात्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जोतिर्लिंगाचे ठिकाणी यापूर्वी पारायणे झाली आहेत. त्रंबकेश्वरचे हे  बारावे पारायण अत्यंत यशस्वी करण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांच्याकडे लष्करीशिस्त आहे हे त्यांच्या यशाचे गमक आहे.वेळेचे व्यवस्थापन,कार्यक्रमाचे नियोजन व त्यानुसार कार्यवाही,कामाची जबाबदारी याबाबी येथे महत्त्वाच्या आहेत. या पारायणात बारा हजार वाचक अपेक्षित होते. तसे नियोजन केले होते.वाचकांची भोजन व्यवस्था अगदी अल्पवेळेत होत असे. या वारकऱ्यांचे भोजन फक्त अर्ध्या तासातच होत असे. हा पारायण सोहळा परिसर पूर्ण व्यसनमुक्त होता. या परिसरात चहादेखील मिळत नव्हता. कारण चहा पिणे हेदेखील एक व्यसनच आहे. या कार्यक्रमामुळे अनेकांनी  चहालादेखील कायमची सोडचिठ्ठी दिलेली आहे.या सोहळ्यात कोणत्याही  किर्तनकाराला मानधन दिले जात नव्हते. थोडक्यात महाराष्ट्रातील दिगग्ज किर्तनकारांनी आपली सेवा मोफत दिली. प्रत्येक किर्तनकाराला वेगवेगळ्या संतांचे अभंग दिले होते. अभंग निवडीचे स्वातंत्र्य किर्तनकाराना नव्हते. कीर्तनातील निम्मावेळ संबधित संतांचे चरित्र सांगण्यात जावा व उर्वरित वेळेत त्याचे निरुपण करावे अशी अपेक्षा होती. ती सर्वच किर्तनकारांनी  बऱ्यापैकी पूर्ण केली. अनेक संतांचा परिचय त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला झाला.
                 या सोहळ्यात प्राप्त होणारा निधी वेगवेगळ्या सामाजिक संस्थाना देण्यात आला.  विशेषतः गोशाळांना  मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले.तात्यांना वारकरी संप्रदायाने संतवीर ही उपाधी दिली आहे ती अगदी सार्थ आहे असे वाटते. बंडातात्यांनी वारकरी संप्रदाय संपूर्ण देशाला परिचित व्हावा ,भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने सर्व जोतिर्लिंगाचे ठिकाणी गाथा पारायणाचे आयोजन केले होते. त्रंबकेश्वर येथील पारायणाने यशस्वी संकल्पपूर्ती झालीअसेच म्हणावेसे वाटते.
                  पारायण सोहळ्याचा परिसर प्लास्टिक मुक्त,प्रदूषणमुक्त,व्यसनमुक्त आढळून आला.आपण जशा सवयी लोकांना लावतो तशा त्यांना लागतात.याठिकाणी प्रत्येकाला आपले ताट स्वच्छ करावे लागत होते. कोणताही अन्नपदार्थ ताटात शिल्लक ठेवायचा नाही ही एक चांगली सवय या कार्यक्रमामुळे लोकांना लागली. या कार्यक्रमात बारा हजार वाचक,बाराशे टाळकरी,बारा मृदंगवादक ,बारा दिवसाचे असा संकल्प केला होता. तो बऱ्याच अंशी सिध्दीस गेला असे म्हणावेसे वाटते.
             निरुपण -संतांचे वाङमय उपेक्षित नसावे.संसारी पुरुष आणि साधक यांच्या जीवनातील फरक विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केला. संसारी माणसाच्या जीवनात सुरुवातीचे काही दिवस स्वप्नवत जातात. नंतर मात्र जबाबदारीच्या ओझ्याखाली कायमचादबला जातो. साधकाच्या जीवनात आसक्ती नसल्याने प्रत्येक दिवस धन्य झाल्यासारखे वाटते.
                संतांच्या भेटीचा परिणाम सुख, समाधान आणि विश्रांतीमध्ये होतो. समाधानाबाबतचे उदाहरण देताना ते म्हणाले की,"तुका म्हणे झाले समाधान,देखिले चरण वैष्णवांचे".चोखोबा हाडाचे वारकरी होते. त्यांना पांडुरंगाने विविध रुपे घेऊन मदत केली.आपण आपले काम प्रामाणिकपणे,निष्टेने केले तर आपणास निश्चितच साह्य होते. संतांचे पाय आपल्या घराला लागतात. मला वाटते आपणास अडचणीच्यावेळी मदत करतात ते आधुनिक युगातील संतच आहेत.
                  आजच्या किर्तनातून आपण कोणतीही सेवा प्रामाणिकपणे केली तर  आपणास निश्चितच कोणत्याही रुपाने समाजाकडून मदत होते असे मला वाटते.
   शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...