सोमवार, २ मार्च, २०२०

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(१०)

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(१०)
            आज  ह.भ.प.श्री.प्रा. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे कीर्तन झाले होते.त्यांनी किर्तनसेवेसाठी संत कान्होपात्रा यांचा अभंग घेतला होता.तो खालीलप्रमाणे
 शिव तो निवृत्ती विष्णू  ज्ञानदेव पाही।सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई।१।
धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया।धन्य ज्ञानदेव सोपान सखया।धृ।
प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती।रेडियाचे मुखे वदविली वेद श्रुती।३।
चौदाशे वरुषांचे तपती तीर रहिवाशी।गर्व हरविला चालविले भिंतीशी !४।
धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची।भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणूनिया ।५।




              निरुपण -- संत कान्हो पात्रा यांच्या चरित्राविषयी  माहिती सांगताना लहवीतकर महाराज म्हणाले की, संत परंपरेत पूर्व जन्माचा उल्लेख करणे पाप आहे असे म्हटले आहे. कान्होपात्रा ही मंगळवेढा येथील शामा नावाच्या वेश्येची कन्या आहे.  कान्होपात्राला आपले वडील कोण हे जाणुन घेण्याची इच्छा असते. पण आई सांगु शकत नाही.काय सांगावे हा तिच्यापुढे प्रश्न असतो. ती म्हणते," पंढरीचा पांडुरंगच तुझा बाप आहे." पांडुरंगाला भेटण्यासाठी कान्होपात्रा  पंढरपूरला येते.पांडुरंगाचे  सुंदर रुप पाहुन ती भारावते आणि मंदिरातच थांबते. तिला पांडुरंगा शिवाय काहीच नको असते.ती अतिशय रुपवान असल्याने तिची चर्चा सर्वत्र होते. बिदरच्या राजाला ती हवीशी असते.तो तसा प्रयत्न करतो पण त्याला यश येत नाही.पांडुरंगाशिवाय तिला कशाचीच आसक्ती असत नाही .आपल्यावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून ती  मंदिरातच प्राणत्याग करते आणि संतपदाला पोहोचते.एखाद्या संतांचा जन्म कोणत्या जाती जमातीत  व्हावा याच्याशी परमात्म्याचे काही देणे घेणे नाही.
            अभंगाविषयी विवेचन करताना महाराज म्हणाले की, निवृत्तीनाथ हे प्रत्यक्ष शिवाचाच  अवतार आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानदेव,सोपान, मुक्ताई हे संत सुद्धा  अवतारी आहेत.शिव शब्द कल्याणदायक आहे. संत तुकाराम महाराजांनादेखील  प्रचंड विरोधास सामोरे जावे लागले. रामेश्वर भट्ट यांनीही तुकाराम महाराजांना विरोध केला होता. पण त्यांचे कार्य पाहून रामेश्वरभट्ट  त्यांचे पट्टशिष्य बनले .थोडक्यात जगद्गुरू तुकाराम महाराजांना  आपले गुरु केले.  कुणब्याला गुरु केल्याचे इतर एतद्देशीय मंडळींना आवडले नाही. पूर्वी शिक्षणाचा अधिकार विशिष्ट वर्गापूरता मर्यादित होता. त्याचा परिणाम म्हणून तो वर्ग खूप अहंकारी झाला होता. त्यांचाही अहंकार उतरवल्याचा उल्लेख तिसऱ्या चरणात आलेला आहे.
           शूद्रांना वेदाचा अधीकार नाही.पण तुकाराम महाराजांनी आपल्या कार्याने इतरांचे गर्वहरण केले आहे. संतांच्यामध्ये फार मोठी शिष्य परंपरा आहे. गहनिनाथ,गोरक्षनाथ, मच्छिंद्र नाथ यांच्यापासून ही परंपरा सुरु होते.निवृत्तीनाथांचे गुरु गहनिनाथ होते. तीच परंपरा पुढे चालत आली. कान्होपात्रा स्वतःला धन्य समजते की मला हा संत सहवास लाभला.खऱ्या अर्थाने कान्होपात्रा संत झाली.
           उच्च जातीत जन्माला आला म्हणून माणूस उच्च होतोअसे  नाही. आपल्या कर्तृत्वानेच तो उच्चपदी पोहोचतो हाच संदेश आजच्या किर्तनातून मिळाला असे वाटते.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...