मंगळवार, ९ जुलै, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट !!(१५ )
      आज वेळापूरहून सकाळी ६ वाजता पालखीचे प्रस्थान झाले.वेळापुरपासून ५ किलोमीटरवर ठाकुरबुवा रिंगण स्थळ आहे.हे रिंगणस्थळ उघडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत आहे. रिंगणस्थळावर दिंड्या नाचत नाचत जातात. फुगड्या खेळतात. पालखी वाजत गाजत रिंगणस्थळावर नेली जाते.रिंगणस्थळावर फक्त पताकावाल्याना सोडतात. रिंगणस्थळावर माऊलींच्या अश्वासाठी रांगोळी काढली होती. फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. माऊलींच्या अश्वाने रिंगणात दोन फेऱ्या मारल्या. शेवटी चोपदार व माऊलींच्या अश्वाने  पादुकांचे दर्शन घेतले. सगळ्यांनीच  माऊली माऊली असा गजर केला होता.रिंगनाचे विविध वाहिन्यांनी चित्रिकरण केले. रिंगणाचे पुढे थोड्याच अंतरावर उजणीचा कालवा आहे. मात्र या कालव्याला पाणी नव्हते.





          काही अंतरावर तोंडले गाव आहे. याठिकाणचा ओढा  नंदाचा ओढा म्हणून प्रसिध्द आहे.  पंढरपूरला जात असताना ज्ञानेश्वर,निवृत्तीनाथ,सोपान, मुक्ताबाई ही भावंडे या ओढ्यात मनसोक्तपणे खेळली होती. त्यांनी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवले होते. आज परिस्थिती बदलली आहे. या ओढ्याला सध्या पाणी नाही. ग्रामपंचायतीने येथे शॉवरची सोय केली होती. प्रत्येक वारकरी मनसोक्तपणे भिजून जात होता. काही वारकरी फुगड्यादेखील खेळत होते.
         तोंडले गावात पालखीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. पालखी विसाव्याच्या ठिकाणी आली तेव्हा दिंड्यानी ज्ञानोबा तुकारामांचा गजर  केला होता.तोंडले गावात वारकऱ्यांना भोजन देण्याची प्रथा आहे. आम्ही याठिकाणी  दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेतला आणि जवळच असलेल्या चिंचेच्या झाडाखाली विश्रांती घेतली.
        तोंडले-bondale ही जुळी गावे आहेत. याठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी याचवेळी तोंडले गावाजवळ येते. ही पालखी पुढे गेल्याशिवाय ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तोंडले गावातुन हलत नाही. आज मार्गावर दोन्ही पालख्या एकत्र आल्याने  प्रचंड गर्दी झाली होती.थोडयाच वेळात संत सोपानदेव महाराजांची पालखी देखील मार्गावर आली होती. पंढरपूर तालुक्यात ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत सोपानदेव तसेच आदिशक्ती मुक्ताई  या पालख्यांचे ग्रामपंचायत पिराची कुरोली व पंचायत समिती पंढरपूर यांनी उत्साहात स्वागत केले.  पिराची कुरोली येथे संत सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊली या बंधुंची भेट झाली.ही भेट बंधुत्वाचे आदर्श उदाहरण आहे. कोणत्याही दोन बंधुमध्ये एकसारखेपणा असत नाही. आपण एकमेकांना समजुन घेतले पाहिजे हाच या भेटीतून  संदेश मिळतो.दुपारनंतर आम्ही वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टच्या कॅम्पला भेट दिली. आमचे सोबत मा.राम धस साहेब,तसेच सुभाष आव्हाड होते. वैष्णव चॅरिटेबलने आमच्यासाठी भजी, चहाची व्यवस्था केली होती.वैष्णवचे सेवा क्षेत्रातील काम खूपच उल्लेखनीय आहे.
     आज आमची  bhandiशेगाव  येथे निवास व भोजन व्यवस्था  ज्ञानेश्वर एलमार यांनी केली. आज ज्ञानेश्वरचा वाढदिवस आम्ही अतिशय उत्साहाने साजरा केला.
          वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट,मुंबई हे ट्रस्ट गेल्या २६ वर्षापासून  ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी पंढरपूर या मार्गावर , तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर तर सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वैद्यकीय सेवा देत आहे. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी   विशेषत पश्चिम महाराष्ट्रात यात्रेचे वेळी वैद्यकीय सेवा देण्याचे काम करीत आहे. या कामासाठी ४०० डॉक्टर,फार्मासिस्ट, परिचारक सेवा देण्याचे काम करत आहेत. वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट सेवाभावी काम करीत आहे. आपण सेवाभावी संस्थाना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतो. आपण कामात भक्ती मिसळली तर ती आपोआपच सेवा होते.वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून सेवा कशी करावी  हाच संदेश मिळतो.
    शब्दांकन  -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...