सोमवार, ८ जुलै, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट !! (१४ )
      आज सकाळी ६.३० वाजता माळशिरसहुन माऊलींचे प्रस्थान झाले.माळशिरस ते वेळापुर पर्यंतचा भाग पूर्ण बागायती आहे.ऊस शेती,केळी,आंबा, पेरु, द्राक्षे,डाळींबाच्या बागा लक्ष वेधून घेत होत्या. खुडूस  याठिकाणी द्राक्षे रोपे मिळतात. याचठिकाणी राज्य शासनाचे औषधी वनस्पती उद्यान आहे.सकाळी ९ वाजताच आम्ही खुडूस येथे पोहोचलो होतो. येथे गोल रिंगण झाले. रिंगणात २ अश्व असतात. एका अश्वावर चोपदार बसतात तर दुसऱ्या अश्वावर माऊली आरुढ होतात अशी वारकऱ्यांची श्रध्दा आहे.प्रत्यक्ष  माऊलींचा अश्व धावत असताना वारकरी" माऊली माऊली "असा गजर करत असतात.



           दुपारी माऊलींनी विझोरी याठिकाणी विसावा घेतला. नंतर माऊली वेळापुरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. वेळापुरच्या अलीकडे साधारण एककिलोमीटर अंतरावर एक तीव्र उतार असणारी जागा आहे. याठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज आले असताना त्यांना पंढरपूरच्या विट्ठल मंदिराचा कळस दिसला. त्यांची पांडुरंग भेटीची ओढ अतिशय तीव्र झाली आणि त्यांनी धावायला सुरुवात केली. त्यासंबंधी एक अभंग आहे तो पुढीलप्रमाणे --सिंचन करिता मूळ!वृक्ष ओलावे सकळ !!१!!नको पृथकाचे भरी!पडो एक मूळ धरी!!२!!पानचोऱ्याचे दार!वरील दाटावे ते थोर!!३!!वश झाला राजा!मग आपल्या त्या प्रजा!!४!!एक आतुडे चिंतामणी!फिरे सर्व सुखधनी!!५!!तुका म्हणे धावा!आहे पंढरी विसावा!!६!!
        हा उतार संपल्यावर  भारुडाचा कार्यक्रम होतो. ते भारूड सादर करणे, त्यात सहभागी होणे याचा मान दिंडी क्र ३ ला आहे. भारुडसम्राट  लक्ष्मण  राजगुरू  व समाजप्रबोधनकार ह.भ.प.महादेव शेंडे यांनी भारुडाचा सुंदर कार्यक्रम सादर केला. भारूड सादर करताना ते म्हणाले की कोणतीही गोष्ट करताना आपण अवधान विचलित करु नये. माणसाचा स्वभाव चंचल असतो. तो शरीराने येथे असला तरी मनाने भलतीकडेच असतो. असे होता कामा नये. ध्येयप्राप्तीसाठी आपणास वेड लागले पाहिजे.
 आज आमची निवास व भोजन व्यवस्था वेळापुर येथील हॉटेल व्यावसायिक विशाल पवार यांनी केली होती.
         थोडक्यात भारुडाच्या माध्यमातून एखादा विषय लोकांपर्यंत सहज पोहचवता येतो.  आपणास अपेक्षित  असणारा  बदल घडवून  आणता  येतो. भारूड  हे समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे असे मला वाटते.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८
  .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...