बुधवार, ३ जुलै, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट !! (९ )




      आज पालखीचे प्रस्थान दुपारी १ वाजता असल्याने आम्ही उशिरा उठलो. उशिराच तयार झालो.आजच्या अल्पोपहाराचे नियोजन खंडाळा येथील प्रा. राजेंद्र बेंद्रे व सौ.हिराताई बेंद्रे यांनी केले होते. अल्पोपहारासाठी धपाटे,उसळ,गुळ, लोणी,कापण्या आणल्या होत्या. या अल्पोपहारामुळे मला नागपंचमी सणाची आठवण झाली. तरडगावमध्येआजची निवास व भोजन व्यवस्था जितेंद्र गाडे आणि बंधूनी केली होती.
       नियोजनाप्रमाणे वेळेत पालखीचे प्रस्थान झाले. लोणंद गावाला यात्रेचे स्वरुप आले होते.पालखी फलटण  तालुक्याच्या हद्दीत आल्याबरोबर प्रशासनाचे वतीने तसेच फलटण तालुक्याचे वतीने ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.दुपारी ४ वाजता तरडगावच्या हद्दीत चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण झाले.माऊलीचा अश्व धावत असताना प्रत्येकजण माऊली माऊली असा जयघोष करत होते.  रिंगण पाहण्यासाठी लोकांनी खूपच गर्दी केली होती.नंतर ज्ञानोबा तुकारामांचा गजर करीत  पालखी मार्गक्रमण करीत होती. तरडगावमध्ये रथ पोहचल्यावर  पालखी रथातून उतरवून पालखी तळापर्यंत खांद्यावर नेली जाते.  हा टप्पा साधारण दोन किलोमीटरचा आहे. पालखी गावातून जात असताना विठ्ठल मंदिर, पवारवाडा,चाफळकरवाडा, सावता माळी मंदिर या प्रत्येक ठिकाणी पालखी उतरवून पाद्यपुजा केली जाते.  या गावातून पालखी जात असताना  प्रत्येकठिकानी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी दिले जात होते.पालखी तळावर पालखी वाजत गाजत नेली जाते. चोपदाराने दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरली परंतु दिंडी क्र.६ ने आपला गजर थांबवला नाही.त्यांचे म्हणणे चोपदाराने ऐकून घेतले. नंतर हरवलेल्या व सापडलेल्या वस्तूंचा उल्लेख केला. दुसऱ्या दिवशी पालखी कधी जाणार हे घोषित केले.
             पालखी तळावर स्वच्छ भारत, निर्मल भारत या अंतर्गत शौचालयाचे महत्व नाटकाद्वारे पटवून दिले जात होते. अशा गोष्टींचा प्रभाव लोकांचेवर पडल्याशिवाय राहत नाही. आज लोणंद पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे स.पो.नि. संतोष चौधरी यांची भेट झाली. ते यापूर्वी बोरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
          वारीत वेळेला खुप महत्व दिले जाते. कोणत्याही परिस्थितीत सर्व कार्यक्रम वेळेत होतात. आपणही वेळेला खुप महत्व द्यायला हवे.वारीतून वेळेचे व्यवस्थापन आपण कसे करावे याचा आपणास संदेश मिळतो असे मला वाटते.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...