मंगळवार, २ जुलै, २०१९

!!पाऊले चालती पंढरीची वाट !! (८ )






       आज पालखी तळापासून  आमचे मुक्कामाचे ठिकाण दूर असल्याने  आम्ही पहाटे ५ वाजताच तयार होऊन मार्गस्थ झालो. वाल्हे येथील पालखीतळ  रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे आहे. रेल्वेची येजा चालुच होती.आज  वाल्हे मुक्कामाहून पालखी ७ वाजता  मार्गस्थ झाली.आज सुरुवातीपासूनच पावसाची रिमझिम चालू होती. सगळा रस्ता चिखलमय झाला होता. पाऊस आणि चिखलमय रस्त्यातून चालणे  वारकऱ्यांसाठी कसरतीचे होते. अशा वातावरणातदेखील वारकरी ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत मार्गक्रमण करत होते.आज थोपटेवाडी -पिंपरे येथे पहिला विसावा होता. या विसाव्याच्यावेळी परीसरातील भाविक वारकऱ्यांप्रती वेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करताना दिसून आले. या परिसरातील लोक वारकऱ्यांना बाजरीची भाकरी,पिठलं, खारातील मिरची अशा प्रकारचे जेवण घेऊन येत असतात. वारकरी याचकाच्या भूमिकेत जाऊन पिठलं भाकरी मागुन आनंदाने खातात .यावेळी माणसाचा अहंकार आपोआपच गळुन पडतो.आम्हीसुद्धा या भोजनाचा आस्वाद घेतला. पांडुरंग कोणालाही उपाशी ठेवत नाही हेच आजच्या कृतीतून दिसुन येते. दुसरा विसावा निरा येथे होता. निरा याठिकाणी परिसरातील नागरिक,ग्रामस्थांनी माऊलींच्या पालखीचे उस्फुर्तपणे स्वागत केले.
      आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेतील सेवानिवृत्त सहआयुक्त  श्री राम धस यांनी केली होती तर रात्रीचं भोजन व निवास व्यवस्था वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई यांनी केली होती.
          निरा नदीमध्ये पादुकांना स्नान घातले जाते. येथे वारकऱ्यांनी स्नानाचा आनंद लुटला. या क्षणाचे चित्रीकरण अनेक वाहिन्यांनी केले.
  निरा नदी ओलांडल्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करते.सातारा जिल्हा प्रशासनाचे वतीने तसेच पंचायत समिती खंडाळा यांचे वतीने  पालखीचे उस्फूर्त स्वागत केले.    
          पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पावसाने थोडी उघडीप दिली.उघडीप दिल्यामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.लोणंद नगरीत पालखीचे ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे स्वागत केले. पालखी तळावर  पालखी वाजत गाजत नेण्यात आली. चोपदारांनी दंड उंचावताच गजर थांबवण्यात आला. परंतु दिंडी क्र.४ ने गजर थांबवला नाही. दिंडीची काही तक्रार असेल तर गजर थांबवला जात नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते ,त्यावर कार्यवाही होते. वारीत आपापसात भांडणतंटा होत नाही. प्रत्येक जण स्वयंशिस्त पाळत असतो. आपण जर स्वयंशिस्त पाळली तर फ़ारसे प्रश्नच उदभवणार नाहीत.     आपणास स्वयंशिशिस्तीचा संदेश वारीतून मिळतो असे मला वाटते.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...