सोमवार, २९ जुलै, २०१९

!!गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाचे निमित्ताने !!
       !!शेतकरी गांधी !!
     गांधीजी जन्माने शेतकरी न्हवते पण शेतकरी होण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. शाळकरी वयात त्यांना फळांची झाडं लावायला आवडत.रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर ते पाण्याच्या बादल्या घेऊन गच्चीत जात आणि झाडांना पाणी घालत.३६व्या वर्षी त्यांनी शेतावर शेतकऱ्यांच जीवन जगायला सुरुवात केली. आश्रमास जागा शोधताना फळझाडे असलेली एक एकर जागा त्यांना पसंत पडली. त्यांनी ती विकत घेतली आणि तिथे परिवारासह रहायला गेले.हळूहळू त्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि पांढरपेशा व्यवसाय सोडून दिला. शेतावरच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी झोपड्या बांधल्या. गांधीजी जमीन नांगरत असत,पाणी काढत,भाज्या आणि फळांची लागवड करत, लाकूड तोडत. लवकरच त्यांनी त्या जमिनीचं फळबागेत रूपांतर केलं.
        दक्षिण आफ्रिकेत दहा वर्षे ते शेतावर राहिले. त्यातून त्यांना शेतीचा चांगला अनुभव आणि ज्ञान मिळालं. त्यांनी मधमाशापालनाची नवीन पध्दत शोधून काढली आणि लोकप्रिय केली.ती अहिंसक होती आणि अधिक शास्त्रीय होती.त्यात मधमाशा आणि पोवळे उध्वस्त होत नसे. शेतीच्या किंवा फळांच्या, भाज्यांच्या शेताजवळ जर मधमाशापालन केलं तर जास्त उत्पन्न कसे मिळतं हे ते समजावून सांगत. मधमाशा मध गोळा करायला जेव्हा फुलांवर जातात तेव्हा त्यांचे परागकण त्यांच्या पायाला चिकटून दुसरीकडे जातात आणि त्यातून उत्पादनाचा दर्जा उंचावतो आणि उत्पादन वाढतं.
      जमीन नापीक आहे, पाणी पुरेसं नाही,चांगली अवजारे नाहीत या सगळ्या तक्रारी गांधीजींनी निकालात काढल्या. आपल्या श्रमाचा कल्पकतेने वापर करणं ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी शक्ती होती शेतकरी उत्साही, कल्पक आणि स्वावलंबी असावयास हवा. आपल्या मुलांना शेतीकाम हे मोठे सन्मानाचे काम आहे हे शिकवायला हवं. शेतीत काम करणं कमी दर्जाचं तर नाहीच उलट तो मोठा मानाचा व्यवसाय आहे."मुलोद्योग शिक्षणाच्या योजनेत शेतीचा भाग फार मोलाचा आहे हा गांधीजींचा विचार होता.
      आजूबाजूला उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तुमधून कंपोस्ट खत कसं तयार करावे याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या. गाईचं शेण, माणसांचं मल-मूत्र, भाज्यांच्या साली या सर्वांचा उपयोग करता येतो. कंपोस्ट खत कुठल्याही भांडवलाशिवाय स्वतःचे श्रम आणि कल्पकता वापरुन करता येतं. आश्रमात मल-मूत्रापासून खत तयार करण्यासाठी जमिनीत उथळ खड्डे केलेले असत. उथळ खड्डयामध्ये काही दिवसात चांगलं खत तयार होत असे.गांधीजींना रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक खत जास्त पसंत होती. पीक लवकर मिळावं म्हणून रासायनिक खतांचा वापर त्यांच्यामते धोकादायक होता. त्यांच्यामुळे जादुसारखा परिणाम दिसण्याऐवजी जमीन कायमची नापीक होण्याची शक्यता जास्त होती.
       गरीब शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवायचं हीच गांधीजींना सतत चिंता होती. वर्षातून चार ते सहा महिने काम नसायचं. नुसत्या शेतीवर भागत नसे.तीस कोटी लोकांचा हा निरुद्योगी वेळ कामी लावण्यासाठी त्यांनी स्त्रियांना घरात चरखा देऊन आणि पुरुषांना हातमाग देऊन प्रयत्न केला त्यांना या अशिक्षित, अर्धनग्न, कुपोषित शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचं होतं आणि त्यांना अशा पातळीवर आणायचं होतं की जिथे त्यांना चौरस आहार, राहण्याजोगत घर,अंगभर कपडे आणि योग्य शिक्षण मिळेल.
           गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी असहकाराची चळवळ सुरू केली, कायद्यानं बंदी असूनही मीठ बनवलं, सार्वजनिक सभांमधून स्वातंत्र्याची शपथ घेतली. सरकारी कर न भरण्याच्या आंदोलनात त्यांच्या जमिनी,मालमत्तेवर जप्ती आली, त्यांच्या पैशाचं नुकसान झालं पण त्यांची उंची वाढली.
         संदर्भ -- बहुरूप गांधी
        लेखक -- अनु बंदोपाध्याय
         संग्राहक -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...