शनिवार, २२ जून, २०२४

!! श्री काळभैरव विद्यालयाचा ४१वा वर्धापनदिन !! (२३ जून)

!! श्री काळभैरव विद्यालयाचा ४१वा वर्धापनदिन !!  (२३ जून) 
          वर्णे ग्रामविकास मंडळ, मुंबई या स्थानिक संस्थेद्वारा आपल्या गावचे विद्यालय चालवले जाते. आजच्याच दिवशी म्हणजे २३ जून १९८३ रोजी आपले विद्यालय सुरु करण्यात आले. आज भौतिक सुधारणा खूप झाल्या आहेत परंतु १९८३ पूर्वीची परिस्थिती खूपच बिकट होती. दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. १९८६ साली एसटीची कायम स्वरुपी  सोय आपल्या गावाला झाली. त्यावेळी सगळ्यांनाच अपशिंगेपर्यंत एसटीसाठी चालत जावे लागत होते.मुलींच्या शिक्षणाची अवस्था अतिशय दयनीय होती. सातवीनंतर मुलींचे शिक्षण बंदच होत होते. खास मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठीच विद्यालयाला त्या काळात मान्यता मिळाली. आपल्या शाळेचे उद्घाटन तत्कालीन शिक्षण सचिव शशिकांत दैठणकर यांच्या शुभहस्ते झाले होते. शाळा संचलनात मुंबईकर ग्रामस्थांचे योगदान अतुलनीय आहे. आजही मुंबईकरांची सतत मदत होत असते.
         


              विद्यालय सुरु झाल्याने गावाचा कायापालट झाला. मुलामुलींनी उच्च शिक्षण घेतले. आज समाजाच्या सर्वच क्षेत्रात मुलं मुली काम करत असल्याचा विशेष आनंद होत आहे. विशेषतः क्रीडा क्षेत्रात विद्यालयाने राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे तसेच वैयक्तीक क्रीडाप्रकारात मल्लखांबमध्ये विद्यालय सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे . सुवर्णकन्या कु. अनुष्का कुंभार ही आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपटू विद्यालयाची माजी विद्यार्थीनी आहे. पॉलिहाऊस असणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणूनदेखील आपल्या शाळेचा विशेष गौरव झालेला आहे.
           शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण, प्रशासन, सैन्यदल, नौदल ,कृषी, उद्योग, वैद्यकीय, सहकार अशा विविध क्षेत्रात कार्यरत राहून आपली प्रगती साधली आहे.सध्या शिक्षण क्षेत्रात खूपच बदल होत आहेत. आपण बदलाचा स्वीकार केला नाही तर कालबाह्य होऊ. इंग्रजी माध्यमाचे पेव फूटल्याने ग्रामीण भागातील शाळा अडचणीत येत आहेत. पूर्वी वाहतुकीची साधने नसल्याने शिक्षक नोकरीच्या गावात राहत होते. आता अपडाऊनचा जमाना 
झाला आहे. शिक्षक अप होत असला तरी ग्रामीण भागातील शाळा डाऊन होत चालल्या आहेत.ही परिस्थिती बदलण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे.
 


   बदलत्या काळानुसार आपल्या शिक्षण संस्थेनेदेखील काही बदल स्वीकारले आहेत. मला याठिकाणी तंत्रशिक्षणाचा खास उल्लेख करावा लागेल. सन २०१३-१४ सालापासून  आपल्या विद्यालयात तंत्र शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. अशी सुविधा सातारा जिल्ह्यातील अगदी मोजक्याच शाळांत उपलब्ध आहे. या शिक्षणाचा फायदा, धंदेशिक्षण, अभियांत्रिकी, शेती पशुपालन, अन्नप्रक्रिया यासाठी प्रामुख्याने होणार आहे. या शिक्षणाचा लाभ आपल्या मुलांनी घ्यावा असे वाटते  संस्थेने याविषयासाठी सुसज्ज वर्कशॉप उभारलेले आहे. आपल्या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री.संजय बाईंग असून ते संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पवार, कार्याध्यक्ष मानसिंग पवार, सेक्रेटरी राजकुमार काळंगे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये काम करत आहेत. वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत.आपण सर्वजणच त्यांना साथ देऊया. 

               ही शाळा गावाचे वैभव आहे. त्यात कशी भर घालता येईल यासाठी प्रत्येक ग्रामस्थांचे योगदान अपेक्षित आहे. आपण ते द्याल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.
            आपली मुलं स्थानिक शाळेतच शिकवूया. विद्यालयाचे व गावाचे नाव सर्वच बाबतीत आघाडीवर नेऊया. मलाही या शाळेच्या जडणघडणीत सहभागी होता आले याचा विशेष आनंद होत आहे.
        विद्यालय वर्धापनदिनानिमित्त  शालेय विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी,संस्था पदाधिकारी या सर्वांनाच शुभेच्छा.
            राजेंद्र पवार
          संचालक
शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई
             ९८५०७८११७८
            ८१६९४३१३०६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...