बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

!!सत्यशोधकी विवाह एक अनुभव !! ( दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ )]

  !!सत्यशोधकी विवाह एक अनुभव !! ( दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ )]

                                                             

                भोर जि. पुणेस्थित असणारे डॉ. विद्या व डॉ. अरुण बुरांडे यांची कन्या कल्याणी (B.Tech COEP, MBA, IIM Kozhikode) आणि लखनौस्थित असणाऱ्या  श्रीमती उमा कांडा यांचे चिरंजीव अक्षय (B.Tech, UPES, PGDM (MDI GURGAON) या उच्च विद्या विभूषित असणाऱ्या वर वधूचा विवाह सत्य शोधकी पद्धतीने संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाल्याचा विशेष आनंद होत आहे.

               सत्यशोधकी विवाह सोहळा साधेपणाने साजरा होत असतो. या विवाहात मुलामुलींनी आपला जोडीदार निवडावयाचा असतो. यामध्ये जातीपातीचे बंधन नसते. या विवाह सोहळ्याला कोणतेही विधी केले जात नाहीत त्यामुळे ब्राम्हणांची आवश्यकता नसते. कोणीही व्यक्ती मग ती स्त्री पुरुष असो, कोणत्याही जाती धर्माची असो ती विवाह संस्कार करण्यास पात्र असते. यात असणाऱ्या मंगल अष्टका वेगळ्याच असतात. त्या आपल्या माहितीसाठी देत आहे.

  सर्वमंगल सावधान...सर्वमंगल सावधान...सर्वमंगल सावधान...

प्रारंभी वंदन वसुंधरेला, 

जीवन दिले सकलांना,

पुरवूनिया जल, अन्न, वस्त्र, निवारा,

जोडोनिया दोन्ही करा, 

वंदूनिया माता पित्यांना, 

आप्तजन मित्र परिवारांना, 

लाभो साह्य सर्वांना तुमचे,

करु पुष्प वर्षाव हर्षभरे 

बोला सर्वमंगल सावधान... सर्वमंगल सावधान.. सर्वमंगल सावधान.....

 करुनिया पूर्व परिचयाला, 

सहचर निवडले स्वबुद्धिने, 

स्विकारतो आज निश्चयाने, 

पती पत्नी म्हणूनी सहजीवनी, 

भेदाभेद अमंगळ मानुनी, 

जपू समता मानव मार्गाने,

विवेकाची कास धरुनी.

बोला सर्वमंगल सावधान.. सर्वमंगल सावधान...सर्व मंगल सावधान....

नशीब, नियती, ग्रह गोल तारे, 

त्यागुनी त्यांचे मनी भय सारे, 

आज स्मरूनी संविधानाला,

गाडून टाकूया दैववादाला, 

वंदू जिजाऊ शिवरायाला,

तथागताला भिमरायाला, 

शाहू, जोतिबा सावित्रीमाई, 

गाडगेबाबा, कबीर, रमाई,

नम्र होऊनी पुष्प वर्षाव करु,

महात्मा बसवेश्वरांना ....

बोला सर्वमंगल सावधान... सर्व मंगल सावधान...सर्वमंगल सावधान...

नाते...निरंतर फुलवायला,

गणगोत, मित्र असे साक्षीला,

कुसुमांच्या माला धरुनी हाती,

सज्ज आज वधूवर या मंचकी,

द्याव्या सदिच्छा भरभरूनिया वधुवरा, 

पुष्प वर्षाव हर्षाने करा 

बोला... सर्वमंगल सावधान... सर्वमंगल सावधान.. सर्वमंगल सावधान.....

             विवाह सोहळा संपन्न होण्यापूर्वी वधू आणि वराचा परिचय करुन देण्यात आला. वधूचा परिचय मुलीची आत्या माधुरी धोंडगे यांनी तर मुलाचा परिचय बहीण अंजना कांडा यांनी करुन दिला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी अडव्होकेट मुक्ता दाभोलकर आणि मिलिंद देशमुख यांनी याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली. त्याचबरोबर या दोघांनी वधू वरांना सहजीवनाची शपथ दिली. वधुने मराठीत तर वराने हिंदीत शपथ घेतली. मिलिंद देशमुख महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारिनी सदस्य असून डॉ. अरुण बुरांडे यांच्या मुलाचा विवाहदेखील याच पध्दतीने झाला होता. यावेळी डॉ. विद्या यांनी विशेष पुढाकार घेतला होता याचा उल्लेख केला. त्यांचे खास अभिनंदन केले. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर वधूला वराच्या हस्ते मंगळसूत्र परिधान करण्यात आले. वरमाला एकमेकास घालण्यात आल्या. सहजीवनाची शपथ देण्यात आली. 

               








      सत्यशोधकी विवाह पद्धत महात्मा फुले यांनी सुरु केली. शंभर वर्षांपूर्वी असे विवाह मोठ्या संख्येने झाले होते. आता मात्र आपण फारच कर्मकांडात गुंतल्यामुळे असे विवाह दुर्मिळ होत आहेत. अशा विवाहात सामाजिक प्रवाहाच्या विरोधी जाण्याची पालकांची तयारी असावी लागते. डॉ. अरुण बुरांडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते असून प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक आहेत. इतकेच नव्हे तर ते सेवानिवृत्त सिव्हील सर्जन आहेत. डॉक्टरांच्या कार्याची नोंद "एसियाज हुज हू" मध्ये झालेली आहे. वधू पिता, वधू तसेच वर यांनी यावेळी महाराष्ट्र अनिसला भरघोस देणगी दिली. याशिवाय डॉ. अरुण बुरांडे यांनी मतीन भोसले संचालित वसतिगृहातील एका फासेपारधी मुलाचे एका वर्षाचे पालकत्व स्वीकारले व यासाठी लागणारी सर्व रक्कम मुक्ता दाभोलकर यांच्याकडे सुपूर्द केली.अशा विवाहात हुंडा देणे घेणे असा प्रकार असत नाही. 

                    या विवाह प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमाबरोबर भारताच्या संविधाना वधू वरांनी अभिवादन केले. थोडक्यात संविधानानुसार मार्गक्रमण करण्याचे अभिवचन दिले. डॉ. अरुण बुरांडे हे आमच्या गावचे सामाजिक चळवळीत अग्रणी असणारे यांत्रिकी अभियंता राजकुमार काळंगे यांचे स्नेही होत. काळंगे साहेबांच्यामुळेच डॉक्टरसाहेब आमचेही स्नेही झाले. या विवाह सोहळ्याला आमच्या गावातील चित्रपट निर्माते मानसिंग पवार सपत्नीक तर माझ्यासह विधीज्ञ प्रल्हाद यादव, मानसिंग काळंगे हे उपस्थित होते.

           राजकुमार काळंगेचे सर्व कुटुंब हा विवाह सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी झटताना दिसत होते. या विवाह सोहळ्याला अक्षता ऐवजी फुलांची उधळण केली जाते. तांदळाची होणारी नासाडी टाळण्याचा संदेश दिला जातो. आपणही आपल्या मुलामुलींचा विवाह साधेपणाने करण्याचा प्रयत्न करावा. विवाहप्रसंगी होणारा अनाठायी खर्च टाळावा. फुले शाहू आंबेडकर यांचे विचार अंगिकारावेत असे वाटते.

   राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

    ८१६९४३१३०६                                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...