व्यायामामध्ये येणाऱ्या गोष्टी मध्ये चालणे, योगासने याचा नियमित सराव करणे फायदेशीर आहे. आताच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकजण नियमित व्यायाम करतोच असे नाही परंतु गर्भिणी कालावधी मध्ये नियमित व्यायाम करणे गरोदर महिला आणि बाळासाठी खूपच फायदेशीर आहे. तसेच नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी देखील याची मदत होते. पूर्वीच्या काळामध्ये महिलांना करावी लागणारी कामे यामुळे त्यांचे शरीर आपोआपच लवचिक राहत होते. आता यासाठी व्यायाम करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने गरोदर महिलेचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले टिकून राहण्यास मदत मिळते. कोणतेही व्यायाम सुरु करण्यापूर्वी आपण ज्या डॉक्टरांचे उपचार घेत आहात त्यांचा सल्ला घेवूनच ते सुरु करावेत.
नियमित चालणे – सर्वांसाठीचा सर्वात सोपा व्यायाम, गरोदरपणाच्या ९ महिन्याच्या कालावधीमध्ये अगदी सुरवातीच्या पहिल्या दिवसापासून प्रसूती पर्यंत करता येतो. चालताना मांड्यांचे स्नायू, निताम्बाचे स्नायू वापरले जातात त्यामुळे कटी प्रदेशमध्ये लवचिकता निर्माण होवून पुढे नैसर्गिक प्रसूती साठी मदत मिळते. चालताना मध्यम गतीने चालणे फायदेशीर ठरते, धावत पळत चालणे किंवा अगदी संथ गतीने चालण्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होवू शकतो. चालताना सकाळी आणि सायंकाळच्या वेळी चालणे फायदेशीर असते. गरोदरपणाच्या सुरवातीच्या ३ महिन्यात चालायला सुरुवात केली असेल तर तेथून पुढे चालण्याचा व्यायाम वाढवत न्यावा.
योगासने - गरोदरपणाच्या कालावधीमध्ये योगासने करताना खूप काळजीपूर्वक आसने करणे आवश्यक आहे. आसनांमध्ये पद्मासन, वज्रासन, बद्धकोनासन आणि शवासन ही सहज करता येणारी आणि गर्भिणी कालावधी मध्ये फायदेशीर अशी आसने करता येतात.
पद्मासन किंवा सुखासन – गरोदर महिलानां ज्या स्थितीमध्ये सुखकारक कोणताही त्रास न होता बसता येते ते सुखासन, शक्य असल्यास पद्मासनात देखील बसावे. यामुळे खुब्याचे सांध्ये लवचिक होण्यास मदत मिळते. खुब्याचे आकुंचन आणि प्रसारण क्रिया सुलभ होते.
वज्रासन – संपूर्ण गर्भिणी अवस्था सहजरीत्या करता येणारे आसन, जेवण केल्यानंतर आसन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. या आसनाने पाय मांड्या आणि कमरेचे स्नायूंचा व्यायाम घडून येतो.
शवासन – गरोदरपणाच्या कालावधीमध्ये शारीरिक आणि मानसिक बदलाचा शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो, शारीरिक आणि मानसिक ताणताणाव कमी करण्यासाठी शवासन हि क्रिया खूपच लाभदायक आहे.
बद्धकोनासन – या आसनाचा नियमित सर्व केल्याने मांड्यांचे स्नायू आणि खुब्याच्या सांध्यांमध्ये लवचिकता निर्माण करण्यास फायदेशीर आहे, प्रसूतीची पूर्वतयारी या आसनाचा सर्व केल्याने होते.
प्राणायाम – नियमित प्राणायाम क्रिया आई आणि बाळाला प्राणवायूचा सुरळीत पुरवठा करण्यास मदत करते. प्राणायाम आणि दिर्घश्वसन यामुळे प्रसूती काळात येणारा थकवा टाळण्यास मदत मिळते. प्राणायाम सकाळी सूर्योदयाच्या वेळी करावे. प्राणायामासोबत ओंकारचा सराव करणे देखील लाभदायक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा