मंगळवार, १ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (९२ )२६ फेब्रुवारी

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (९२ )२६ फेब्रुवारी

                 आमचा कालचा मुक्काम मांडला जिल्ह्यातील बिलगाव येथे होता. येथे स्नानासाठी पाण्याची चांगली सुविधा नसल्याने आम्ही रामनगर येथे आलो. तेथे रौनक साहू यांच्या घरी स्नान, पूजा हे सर्वच सोपस्कार पूर्ण केले. त्यांच्याच घरी सकाळचा अल्पोपहार ( बालभोग ) घेतला. बालभोग कसला त्याला जेवणच म्हणायला हवे. दुपारचे भोजन मांडलास्थित असणारे शक्ती क्षितिजा यांनी आणले होते ते आम्ही मधुपुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेतले. रामनगरपर्यंतचा सर्वभाग जंगलमय होता. रामनगर ऐतिहासिक शहर असून गोंड राजा हृदय शाह यांचा दिवाण राय भगत यांनी येथे ही कोठी बांधली आहे. ती राय भगतची कोठी म्हणून ओळखली जाते. प्रवेशद्वार हे संगमरवरी असून आतमध्ये एक भिंत बांधली असल्याने आतमधील काहीही दिसत नाही. ही कोठी भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहे. त्याच परिसरात गोंड शासक यांची बेगम हिच्यासाठी महाल बांधला आहे. हा महाल दूर असल्याने आम्ही तो काही पाहू शकलो नाही. वाटेत एक छोटेसे गुऱ्हाळ पाहण्यात आले. हे गुऱ्हाळ कमी खर्चिक वाटले. छोट्या प्रमाणात ऊस असेल तर असे गुऱ्हाळ आपण सहज करु शकतो. येथील गुळाचा दर्जा चांगला असल्याचे आम्हास सांगितले. मधूपुरीपासून सुर्यकुंडपर्यंत आमच्या बॅगा शक्तीभाईनी आणल्या त्यामुळे आम्हाला थोडेसे हायसे वाटले.









     आमचा मुक्काम  नर्मदा तटी असणाऱ्या सुर्यकुंडमध्ये आहे. सुर्यकुंडमध्ये भव्य असे हनुमान मंदिर आहे. येथील हनुमान मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. सकाळी ही मूर्ती बालस्वरूप वाटते तर दिवसभर यौवन स्वरूपात भासते तर हीच मूर्ती  रात्री वृध्दाअवस्थेत आहे असे वाटते. येथे नर्मदा मंदिर, राधाकृष्ण मंदिर अशी मंदिरे आहेत. येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते.

    आपल्या परिसरात ऊस भरपूर आहे. थोडासा ऊस आपण गुळासाठी राखून ठेवला तर आपणही अशी छोटी गुऱ्हाळे तयार करु शकतो. सध्या तर साखरेऐवजी गुळाची किंमत वाढलेली आहे. सध्या तर गुळाचा चहा पिण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. रोजच्या आहारात गुळाचे सेवन वाढलेले आहे. लोकांच्या मानसिकतेचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घ्यायला हवा. आपणही आपल्या परिसरात अशी छोटी गुऱ्हाळे सुरु करुन  व मूल्यवर्धन करायला हवे असे वाटते.

     राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...