!! आमची नर्मदा परिक्रमा !! (९० )२४ फेब्रुवारी
आमचा कालचा मुक्काम सलेय्या येथे होता. सध्या आम्ही लवकर मार्गक्रमण करत आहोत. आज सगळा घाट रस्ताच होता, जिकडे पहावे तिकडे जंगलच, जंगल अशी परिस्थिती होती. आज सकाळी सक्का येथील पाठक किराणा स्टोअरच्या प्रोपायटर रंजिता पाठक यांनी आम्हास दूध दिले. आज दुपारी हरा टोला येथे भोजन प्रसाद घेतला. आता बऱ्याचवेळा सदाव्रताचा अनुभव घेत आहोत.तुम्हाला माहीतच आहे, सदाव्रत म्हणजे स्वतः स्वयंपाक करणे होय. वाटेत किसलपुरा, सक्का, राई, हराटोला ही महत्वाची गावे लागली.
वाटेत एका झाडावर मधमाशांची अनेक पोळी पाहायला मिळाली. शेतीत मधमाशीला खूपच महत्व आहे. परागीभवनासाठी मधमाशा महत्वाची भूमिका बजावतात. मधमाशीचे अस्तित्व धोक्यात आले तर शेती पूर्णपणे धोक्यात आली असे समजायचे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे मधमाशी पालना संदर्भात राज्याचे केंद्र आहे. ते मधुसागर म्हणून ओळखले जाते. मधमाशी पालन हा फार मोठा व्यवसाय आहे. मधमाशी पालना संदर्भात वारंवार कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे प्रशिक्षणे घेतली जातात त्याचाही लाभ आपण घेतला पाहिजे.
आज वाटेत एका ठिकाणी तेंदूपत्ता गोडाऊन पाहण्यात आले. बिडी वळण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. डींडोरी जिल्हा आदिवासीप्रणित आहे. येथे जंगलाचे प्रमाण खूप मोठे आहे. आदिवासी लोक पाने तोडून आणतात व त्याची शासनामार्फत खरेदी होते. या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मध्यप्रदेशात बिडी ओढण्याचे प्रमाण जास्त आहे. या जिल्ह्यात शिक्षणाचे प्रमाण कमी आणि व्यसनाचे प्रमाण जास्त अशी येथील स्थिती आहे. तेंदूपत्त्यामुळे येथील लोकांना फार मोठा रोजगार मिळतो हे मात्र नक्की. मी व्यसनाचे समर्थन मुळीच करणार नाही.
आपणास चांगली शेती करायची असेल तर मधमाशा जगल्या पाहिजेत. आपण आपल्या शेतात देखील मधमाशा पेट्या ठेऊ शकता आणि आपले उत्पन्न वाढवू शकता. आम्ही आमच्या घरी हा प्रयोग केला होता. मधमाशीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मधमाशांची पोळी जाळू नका. मध गोळा करणे हा उत्तम व्यवसाय होऊ शकतो. चला तर मधमाशा टिकवून ठेवण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील राहूया आपलं शेतीतले उत्पन्न वाढवूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadaparikrama #narmadariver #dindori #jivashma #shivaputri #narmadamai #narmadehar #shiva
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा