!! आमची नर्मदा परिक्रमा !! (७० )
आमचा कालचा मुक्काम रायसेन जिल्ह्यातील केतूधान येथे होता. आज सकाळी लवकर चालण्यास सुरुवात केली. आज संपूर्ण मार्ग नदीकाठचा होता. नदीकाठी गाळपेर क्षेत्र खूप मोठया प्रमाणावर आहे. प्रामुख्याने गहू, हरबरा, मसूर तसेच भाजीपाला पिके मुबलक प्रमाणात दिसून आली. आम्ही कधी गव्हाच्या पिकातून, चिखलातून, कधी वाळूतून, बहुतांशी नदीकाठाने चाललो होतो. गाळपेर क्षेत्रात फिरस्त्या जनावरांचा त्रास होऊ नये म्हणून कुंपण घातले जाते. या मार्गावरुन चालणे म्हणजे मोठी कसरत असते. आपल्याकडील कुळवाचे जे काडवान असायचे ते उलटे रोवलेले असते. त्यामधून मार्ग काढून पुढे जायचे असते. कृषी यांत्रिकीकरणामुळे नव्या पिढीला काडवान शब्द माहीत नाही. कुळव, फरांदी, पाभर (कुरी) अशी औते शेतात नेण्यासाठी काडवानाचा वापर केला जात असे.आता काडवान कालबाह्य झालेले आहे.
आज दुपारचा भोजन प्रसाद रायसेन जिल्ह्यातील बोरास या ठिकाणी घेतला. हे अन्नक्षेत्र भोलेबाबा चालवतात. त्यांनी नर्मदा तटावर छोटीसी कुटी उभारली आहे. याठिकाणी कोपरगावचे उषा कुमावत, ज्ञानेश्वर कुमावत हे गेली दोन वर्षे सेवा देत आहेत. कुमावत दांपत्याने भोलेबाबांच्याबरोबर परिक्रमा केली होती. ही सेवा केवळ बाबांच्या सानिध्यामुळे करत आहोत. चौरास गावी चंद्रपालसिंह अन्नक्षेत्र चालवतात. हा आश्रम साधाच आहे पण पंचतारांकित हॉटेलसारखा वाटतोय.
आमचा मुक्काम श्री स्वामी समर्थ मठ, अनघोरा (जनकेश्वर धाम ) येथे आहे. हा मठ उन्मेष आनंद चालवतात. ते स्वतः एल.एल.बी.आहेत. त्यांचे काही काळ सातारा येथे वास्तव्य होते. ते स्वामी समर्थांचे भक्त असून नर्मदाकाठी साधना करीत आहेत.
सत्संगाने माणसाचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. आयुष्यात संगत महत्वाची आहे. आपणाला कोणाची संगत लाभते त्यानुसार आपलं जीवन घडते. कुमावत दांपत्य भोलेबाबांच्या सत्संगाने पूर्णपणे बदलून गेले. आपणासही नेहमी सत्संग लाभेल असा प्रयत्न करावयास हवा असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा