!!आमची नर्मदा परिक्रमा !! (६९ )
आमचा कालचा मुक्काम मुआर गावात ब्रिजेश ठाकूर यांच्या घरी होता. ठाकूर कुटूंबियांनी आमचं चांगलेच आदरातिथ्य केले इतकेच नव्हे तर दक्षिणाही दिली. आज वाटेत डुमर मांगरोल सिवनी, आलीगंज, बरहा ही गावे लागली. आजचा मुक्काम केतूधान येथील मा. नर्मदा मंदिर आश्रमात आहे.
आज दुपारी मांगरोल येथे संजय मालानी, सरोज मालानी या नाशिकच्या दाम्पत्याची भेट झाली. गेला महिनाभर ते आश्रमात सेवा देत आहेत. या दांपत्याने सन २०१६-१७ मध्ये नर्मदा परिक्रमा केली होती. परिक्रमेचा चार महिन्याचा कालावधी गृहीत धरला तर आपल्यावर अनेक लोकांचे ऋण झालेलं आहे ते ऋण आपण किमान सेवेच्या माध्यमातून फेडायला हवे म्हणून आम्ही परिक्रमा मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी सेवा देत आहोत. प्रत्येकानेच सेवेच्या माध्यमातून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा असेदेखील ते म्हणाले.
शेतीचा विचार करता गहू, हरभऱ्याची शेती अधिक आहे पण काही ठिकाणी सरसू (तेलबिया) ची शेती पहायला मिळाली. आपल्या देशात तेल मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. तेलबियासाठी काही प्रोत्साहनपर योजना आखल्या तर काही अंशी तेलबियांचे उत्पादन वाढेल, लोकांच्या आहारात तेलाचे प्रमाण वाढेल, आयातीवरचा खर्चही कमी होईल.
आज वाटेत बऱ्याच ठिकाणी शेणीचे ढीग दिसून आले. शासनाने घरोघरी गॅस पोहचवण्याचा प्रयत्न केला पण याठिकाणी मात्र शेणीचा सर्रास वापर होताना दिसत आहे. धुरामुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रामुख्याने देशातील अशा भागात घरोघरी गॅस पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असे वाटते.आपण गॅसचाच वापर करावा अशी मानसिकतादेखील महिलांची तयार होणे गरजेचे आहे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा