!! आमची नर्मदा परिक्रमा !! (६३ )
आमचा कालचा मुक्काम सीहोर जिल्ह्यातील खडगाव येथे परशराम यादव यांच्या घरी होता. सध्या मध्यप्रदेशात थंडीने विक्रम गाठला आहे. दहा वाजेपर्यंत शेकोट्या पेटलेल्या असतात. आज आम्ही चालण्यास उशिरा सुरुवात केली.वाटेत बाबरी घाट, मठा, नेहलाई, रेऊग्राम, मर्दानपुरा आदी गावे लागली. आज दुपारी नेहलाई येथे भोजन प्रसाद घेतला. आजचा मुक्काम आवली घाट येथे आहे. आम्ही ४ वाजताच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत.
आवली घाट हे आध्यात्मिक व पौराणिक दृष्ट्या खूप महत्वाचे ठिकाण आहे. त्याची माहिती खाली देत आहे. मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील शिवनीमालवा प्रांतातील आवली घाटाचे रहस्य :
आवली घाटाला आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे. प्रत्येक अमावास्या पौर्णिमेला नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी खूप दूरवरून लोक येतात. याठिकाणी हत्याहरणी हथेड नदी नर्मदेला मिळते. थोडक्यात हे संगम स्थळ आहे. असे म्हटले जातेकी वर्षातून दोन वेळा गंगा दशमी आणि आवला नवमीला भीम नर्मदा स्नान करण्यास येतात. या तिथीच्या वेळेस वाळूत भिमाची पावले दृष्टीस पडतात. येथे भेट दिल्यानंतर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असेही म्हटले जाते.
येथे प्राचीन नर्मदामंदिर, भगवान शंकर, हनुमान मंदिर, धुनिवाले बाबांचे समाधी स्थळ आहे.
पौराणिक महत्व : आवली घाटाशी संबंधित काही दंतकथा जोडल्या आहेत. आवली घाट हे पांडवांचे तपस्या स्थळ होते. वनवासकाळात पांडव काही काळ येथे राहिले होते. महाभारत काळात भीमाने नर्मदेचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या पाऊलखुणा आजही पाहायला मिळतात. असे म्हटले जाते की साक्षात लक्ष्मी रथात स्वार होऊन कुंती मातेस भेटायला आली होती. त्या रथाची निशाणी आजही दगडात पहावयास मिळते असे हे आवली घाट ठिकाण आहे.
शेतीच्यादृष्टीने विचार केला तर जमीन चढ उतार असणारी आहे. पिके गहू, हरबरा हीच आहेत. आवली घाटावर प्रचंड गर्दी असते. पुढील पिढीला वारसा समजण्यासाठी ही प्राचीन स्थळे आपण जपली पाहिजेत असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा