!! आमची नर्मदा परिक्रमा !!(३२ ) कल्पना करा, कमरेवर मूल, डोक्यावर ओझं घेऊन तीन हजार किलोमीटर चालणे
आमचा कालचा मुक्काम भरुच जिल्ह्यातील झनोर येथे होता. रस्ता चांगला असल्याचे समजल्यामुळे आम्ही लवकर चालण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष पायवाटेने अगदी शेतातून यावे लागले. थोड्याच वेळात नांद गाव आले. तेथे श्री योगानंद सेवाश्रम आहे तो आपल्याकडील मुंबईच्या माताजी चालवतात. त्यांनी आम्हास परिक्रमेत कोणत्या गोष्टी बारकाईने पाहिल्या पाहिजेत हे जाणीवपूर्वक सांगितले. नांद गाव भरुच जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. ओझ गावापासून वडोदरा जिल्हा सुरु होतो.
ओझ गावात रामेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकानाला प्राचीन अयोध्या असे म्हटले जाते. रस्त्याने अनेक परिक्रमावासी चालले होते. एक महिला आपल्या लहान बाळाला घेऊन परिक्रमा करताना दिसली. नर्मदामाईवर पूर्ण श्रध्दा ठेऊन तिचे मार्गक्रमण चालले होते. कल्पना करा, कमरेवर मूल, डोक्यावर ओझं घेऊन तीन हजार किलोमीटर चालणे किती अवघड आहे. श्रध्दा असलीकी आपणास काहीच अवघड वाटत नाही हेच येथे दिसून येते.
दुपारच्या भोजन प्रसादासाठी मोठी कोरल येथे यावयाचा निर्णय घेतला. हे ठिकाण नर्मदा तटावरील अतिपवित्र ठिकाण मानले जाते. हा परिसर अतिशय भव्य होता. आजचा मुक्काम नारेश्वर येथे आहे. हे ठिकाण सर्व सोयीने युक्त आहे.
येथे नारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. ही रंगावधूत महारांजाची तपोभूमी आहे. येथे मोठे भक्त निवास आहे. आपल्याकडील गोंदवलेसारखी ही येथील स्थिती आहे. नारेश्वर मोठे तीर्थक्षेत्र असल्याने या परिसरात अनेक फुलांच्या बागा दिसून आल्या. स्थानिक परिस्थितीनुसार शेतीत झालेले बदल जाणवले.
स्थानिक पातळीचा विचार करुन शेतकऱ्यांनी शेतीत बदल केले आहेत. आपणसुद्धा " विकेल ते पिकेल" हेच धोरण अवलंबले पाहिजे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा