!! आमची नर्मदा परिक्रमा !! (२७ ) समुद्रातील धोकादायक प्रवास , उत्तर तटावरील पहिला दिवस
कालचा मुक्काम नर्मदेच्या दक्षिण तटावरील कठपोर येथे होता.आमच्या बोटी सकाळी सहा वाजता सुटणार होत्या.आम्हाला चार वाजताच बोटीसाठी निघावे लागले. धक्क्यापर्यंत जाण्यासाठी सव्वा दोन किलोमीटर चालावे लागले. सागरकिनारी परिक्रमावासीयांची गर्दीच गर्दी होती. बोटीत साहित्य चढवणे एक दिव्यच होते. सगळे सोपस्कार आटपून आमची बोट साडे सहा वाजता सुटली.
उत्तर तटावर येण्यासाठी बोटीला साडेचार तास लागले. हा प्रवास आपल्याकडील वडापसारखा वाटला. परिक्रमावासीयांच्या सुरक्षेची कोणतेही काळजी घेतली जात नाही. सर्व नर्मदा मैय्यावर सोपवले जाते. खर वास्तविक लाईफ जॅकेट पुरवणे गरजेचे आहे. मध्यन्तरी दाट धुक्यामुळे पुढचे काहीच दिसत नव्हते. एका ठिकाणी नांगर टाकून बोट थांबवली. सागरातील प्रवास साधारण ४५ किलोमीटर एवढा आहे. जेट्टी बांधल्यामुळे उतरताना कोणताही त्रास जाणवला नाही. आम्ही दुपारी मिठी तलाई (दहेज ) याठिकाणी पोहोचलो. हा आश्रम आळंदीच्या जोग महाराजांच्या नावाने चालवला जातो.
याठिकाणी आपणास नेहमीच गर्दी पहायला मिळते. येथे एक मोठा तलाव आहे तेथे कपडे धुणे, अंघोळ करणे यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आम्ही तेथेच दुपारचा भोजन प्रसाद घेतला. थोडी विश्रांती घेऊन पुढील वाटचालीस सुरुवात केली. तीन किलोमीटर अंतरावर भरुच जिल्ह्यातील वागरा तालुक्यात अंभेटा गावी कृष्णानंद आश्रम आहे. आश्रमाचा परिसर स्वच्छ आहे. शेजारीच मोठा तलाव आहे. आजचा मुक्काम सुवा या गावात आहे. येथे शिंगनाथ महादेवाचे मंदिर आहे तसेच शेजारी नर्मदा मैय्याचे मंदिर आहे.
दहेज पासून सुवा गावांपर्यंत रिलायन्स कंपनी आहे. तिची भिंतच ११ किलोमीटर भरली. येथे कंपनीचे गॅस उत्पादन आहे. बाकीचा सारा परिसर जंगलमय आहे. शेती नावाचा प्रकारच दिसून आला नाही. आज अरबी समुद्रातील प्रवास धोकादायक वाटला. सर्वच परिक्रमा वासीयांच्या जीविताची काळजी घ्यावी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा