मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

!! भगिनी निवेदिता जन्मदिन !! (२८ ऑक्टोबर )

 

!! भगिनी निवेदिता जन्मदिन !!
   (२८ ऑक्टोबर )



       भगिनी निवेदिता जन्म:२८ऑक्टोबर १८६७ मृत्यू:१३ ऑक्टोबर १९११
  भगिनी निवेदिता यांचे  मूळ नाव 'मार्गारेट एलिझाबेथ नोबुल' असे होते. त्या एक इंग्रजी-आयरिश सामाजिक कार्यकर्त्या लेखक, शिक्षक आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या.
            भारतीयांना भगिनी निवेदिता यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. परदेशी असूनदेखील त्यांनी भारतवासीयांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी धडपडणाऱ्या लोकांना भगिनी निवेदिता यांनी उघडपणे मदत केली. त्या स्वतः१९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या
अधिवेशनाला उपस्थित होत्या. भगिनी निवेदिता यांच्या घरी रवींद्रनाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, अरविंद घोष, जगदीशचंद्र  बोस आदींची ये-जा असे. त्याचबरोबर कलाकार ,बुद्धीजीवी लोक यांचीही ऊठबस असे.
               त्याकाळात बालविवाह प्रथा होती,स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. स्त्रियांची स्थिती केवळ शिक्षणानेच बदलू शकते म्हणून महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी "निवेदिता बालिका विद्यालयाची" स्थापना केली.या शाळेचे उदघाटन रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदादेवी यांच्या हस्ते झाले. शारदादेवी भगिनी निवेदिताना आपली मुलगी मानत आणि ते नाते त्यांनी शेवटपर्यंत टिकवले. त्यावेळी आपल्या देशावर ब्रिटिशांचे राज्य असल्याने शाळांमध्ये" वंदे मातरम" म्हणण्यास परवानगी नव्हती अशी बंदी असताना देखील त्यांनी ही प्रथा आपल्या शाळेत चालू ठेवली.  त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बंगाल स्कूल ऑफ आर्टची देखील स्थापना केली, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीही प्रयत्न केला.
                 भारतात येण्यापूर्वी त्यांनी  शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. वयाच्या पंचविसाव्या वर्षीच विम्बल्डनमध्ये "रस्किन स्कूल" नावाची शाळा स्थापन केली होती. विवेकानंद इंग्लंडला गेले असताना , भगिनी निवेदिता यांनी गरीब, गरजूना मदत करण्याचे विवेकानंदाचे आवाहन ऐकले,ते त्यांना खूप भावले.त्यामुळे त्या प्रभावित होऊन  पुढील कार्यासाठी वयाच्या ३०व्या वर्षीच भारतात आल्या.
           स्वामी विवेकानंद यांनी मार्गारेट नोबल यांचे २५ मार्च १८९८ रोजी"भगिनी निवेदिता"असे नामकरण केले.भारतात १८९९ मध्ये प्लेगची साथ आली असताना स्वतःचा जीव धोक्यात घालुन भगिनी निवेदिता यांनी कोलकाता येथे रुग्णांची सेवा केली.मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे हे आपल्या कृतीतून त्यांनी पटवून दिले.
     भगिनी निवेदिता यांचा मृत्यू  वयाच्या ४४व्या वर्षी १३ ऑक्टोबर १९११रोजी प.बंगाल येथे झाला.आपले संपूर्ण जीवन भारतासाठी समर्पित करणाऱ्या भगिनी निवेदिता यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
           संकलक : राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...