!! दादाभाई नौरोजी स्मृतिदिन !! (३० जून )
जन्म :४ सप्टेंबर १८२५ मृत्यू:३० जून १९१७ ब्रिटीशांकडून भारतीयांचे होणारे शोषण सर्वप्रथम जगासमोर मांडणारे, दादाभाई नौरोजी यांना भारतीय राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळखतात. त्यांना भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे जनक मानले जाते. परकीयांच्या वर्चस्वाखालील भारतातील आर्थिक घटनांच्या विशदीकरणाची किती नितांत आवश्यकता आहे, ते दादाभाईंनी अर्थशास्त्रज्ञांना दाखवून दिले आणि जगासमोर आर्थिक प्रक्रियेचे वास्तव व परिपूर्ण चित्र त्यांनी उभे केले. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.
१९०२ साली दादाभाई लंडनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिन्झबरीमधून निवडून आले. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यास्तव संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापकपदावर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. त्यांनी गणित आणि तत्वज्ञान हे दोन विषय शिकवले.
दादाभाई हे मवाळ पक्षाचे असून घटनात्मक राज्यपद्धतीवर त्यांचा दृढ विश्वास होता. दादाभाई जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते आणि प्रभावी वक्ते होते. इंग्रजी व गुजराती या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी काँग्रेसचे १८८६ मधील कलकत्त्याचे अधिवेशन, १८९३ मधील लाहोर अधिवेशन आणि १९०६ मधील कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. दादाभाईंनी १८७८ मध्ये पॉव्हर्टी ऑफ इंडिया नावाची एक पत्रिका प्रसिद्ध केली तिचेच पुढे पुनर्मुद्रित व विस्तारित अशा एका ग्रंथात रूपांतर करण्यात येऊन तो ग्रंथ लंडनमध्ये पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ह्या शीर्षकाने प्रथम १९०१ व नंतर १९११ मध्ये प्रकाशित करण्यात आला.
एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीपुरुष-समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. ‘द स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ ह्या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात त्यांचे नाव आणि कार्य चिरंजीव स्वरूपाचे आहे. दादाभाईंचे मुंबई येथे वयाच्या ९२ व्या वर्षी ३० जून १९१७ साली निधन झाले.
दादाभाई नौरोजी यांना विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा