!! पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी !!(९ मे)
कर्मवीर भाऊराव पाटील जन्म : २२ सप्टेंबर १८८७ मृत्यू : ९ मे १९५९ यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची महाराष्ट्रात ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७ वसती गृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, ५ तंत्र विद्यालये, ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ८ डी.एड. महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेच्या मुलांसाठी ६८ वसतिगृहे, ८ आश्रमशाळा, २ आयटीआय व इतर. एकूण संस्था ६७९ अशा आहेत.
भाऊराव पाटील यांनी सुरुवातीस काही काळ ओगले काच कारखाना,किर्लोस्कर नांगर कारखाना, कूपर इंजिनिअरिंग वर्क्स येथे काम केले होते. सुरुवातीला काही काळ शिकवण्या घेतल्या होत्या. त्यावेळी लोक त्यांना पाटील मास्तर असे लोक संबोधित.त्यांच्या शिक्षणविषयक कामात त्यांची पत्नी "रयतमाऊली"लक्ष्मीबाई पाटील यांचाही फार मोठा वाटा आहे. साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले.त्याचे नाव शाहू बोर्डिंग असे आहे.तिचे उदघाटन महात्मा गांधी यांनी केले होते. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील काले या गावी सत्यशोधक समाजाच्या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी 'रयत शिक्षण संस्था' या नावाने एक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात यावी असा ठराव मांडला व तो एक मताने मंजूर झाला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वत:च्या मालकीची जमीन करणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेला 'रयत शिक्षण संस्था' हे नाव सार्थ वाटते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर सत्यशोधकी विचारांचा प्रभाव होता. शाहू महाराजांची प्रेरणा घेऊनच त्यांनी काम केले. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणेसाठी शिक्षण आवश्यक आहे.यासाठीच रयत शिक्षण संस्थेची स्थापना. त्यांनी शिक्षणातून समता, बंधुता ही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न. या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी वसतिगृहे सुरु केली. वसतिगृहात सर्व जातीधर्माचे लोक एकत्र राहत. एकत्र स्वयंपाक करत, एकत्र जेवण करत. यामधून त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला.१९३२ मध्ये महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये" पुणे करार"झाला होता.या ऐक्याच्या स्मरणार्थ युनियन बोर्डिंगची स्थापना पुणे येथे भाऊराव पाटील यांनी केली.
महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटील यांना "कर्मवीर"ही पदवी देऊन गौरव केला. भारत सरकारने पदमभूषण तर पुणे विद्यापीठाने डी. लिट.ही पदवी दिली.
खालील प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन रयत शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.
१)बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
२) मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
३)निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत
प्रेमभाव निर्माण करणे.
४)अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या
विकासाचे वळण लावणे.
५)एकीचे महत्त्व कृतीने पटवून देणे.
६) सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
७)बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.कमवा आणि शिका योजना ही संस्थेने शिक्षण क्षेत्रास दिलेली मोठी देणगी होय.
नुकतेच रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.या विद्यापीठात ३ ते ५ महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. यामध्ये सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (स्वायत्त ),धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त ),छत्रपती शिवाजी महाविद्यालय(स्वायत्त ), यांचा समावेश असणार आहे. हे विद्यापीठ शासनमान्य,पूर्ण अनुदानित असून अकॅडेमिक अधिकार संस्थेकडे असणार आहेत.
रयत गीत
रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे,
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे.!!ध्रु!!
पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारत सरकारने "भारतरत्न" देऊन सन्मानित करावे. कर्मवीरांच्या कार्याचा मरणोत्तर गौरव व्हावा असे वाटते.
पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
(रयत गीत ऐकण्यासाठी आपणास यु ट्यूबची लिंक देत आहे, आपण गीत ऐकावे.)
https://youtu.be/FZBSebom7uI
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
विनम्र अभिवादन💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवा