!! गुरुदेव रवींद्रनाथ टागोर जन्मदिन !!
(७ मे )
जन्म: ७ मे १८६१ मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१ रवींद्रनाथ टागोर ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला.गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९१३ साली नोबेल पुरस्कार मिळाला. असा साहित्यासाठी पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत.
१९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने"सर"ही पदवी दिली होती परंतु जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी निषेध म्हणून ती सरकारला परत केली.
सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख केंद्रापैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभावदेखील रवींद्रनाथ टागोर यांच्यावर होता. त्यांनी संत तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास केला होता. तुकारामांचे अभंग बंगाली भाषेत अनुवादित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनही त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते.त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर खंडकाव्य रचले आहे.
२७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्त्याला राष्ट्रिय सभेचे सव्वीसावे अधिवेशन भरले होते. त्यावेळी त्यांनी रचलेले "जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता" हे गीत गायले. पुढे तेच आपले राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीत हीच त्यांची देशाला मोठी देणगी होय.
गीतांजलीतील एका कवितेचे मराठी भाषांतर
प्रार्थना
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही,
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा.
दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तु सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही,
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा.
जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली,
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा.
माझे तु करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही,
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा.
माझे ओझे हलके करुन
तु माझे सांत्वन केले नाहीस तर माझी तक्रार नाही,
ते ओझे वहायची शक्ती मात्र माझ्या मनात असावी
एवढीच माझी इच्छा.
सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखाच्या रात्री जेव्हा,सारे जग फसवणूक करेल,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र
निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा