!! रामकृष्ण परमहंस जन्मदिन १८३६ !!
(१८ फेब्रुवारी )
रामकृष्ण परमहंस (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय)जन्म१८फेब्रुवारी१८३६ मृत्यू १६ ऑगस्ट १८८६ हे एकोणिसाव्या शतकातील बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते.आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.
रामकृष्ण परमहंस ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णवब्राह्मण परिवारात जन्मले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले, त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना सुरू केली.रामकृष्णांच्या आरंभीच्या काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंमध्ये भैरवी ब्राह्मणी या साध्वीचा समावेश होतो. तंत्र व वैष्णव भक्तीमध्ये भैरवीला गती होती. नंतर रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार एका अद्वैत वेदान्तीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली. रामकृष्णांनी इतर धर्मांबाबतही, विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जातात असे म्हटले.
ग्रामीण बंगाली भाषेतील छोट्या छोट्या कथांचा तेथील जनतेवर बराच प्रभाव पडला. त्यामुळे रूढार्थाने अशिक्षित असतानाही रामकृष्ण बंगाली विद्बज्जन समाजाचे व शिक्षित मध्यमवर्गाचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरले. १८७० च्या दशकाच्या मध्यापासून पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिजीवींवर त्यांचा प्रभाव पडला व नंतर ते बंगालमधील हिंदू प्रबोधनाचे उद्गाते ठरले.
सर्व धर्मीयांसाठी त्यांचा “जतो मत, ततो पथ” (जितकी मते, तितके पंथ) हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे.परमहंसांचे खालील उद्गार प्रसिद्ध आहेत.
“माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक – हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान म्हणतात पाणी, - पण वस्तू एकच असते. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो - परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते.”रामकृष्ण परमहंस यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा