!! डॉ.सरोजिनी बाबर जन्मदिन !!
(७ जानेवारी )
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर जन्म: ७ जानेवारी १९२० मृत्यू २० एप्रिल २००८ या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते.
सरोजिनीबाईंचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. लोकसाहित्याचे अतिशय उत्तम प्रकारे संशोधन, संपादन आणि संकलन करून या संस्कृतीचा फार मोठा ठेवा त्यांनी महाराष्ट्राला कायमचा उपलब्ध करून दिला आहे.
सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद करणारी अशी होती.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री चिं.ग. कर्वे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.
महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचे सरोजिनी बाबर यांच्याकडे येणे-जाणे असायचे. त्यांपैकी काही जण : प्र.के. अत्रे, कवी गिरीश, बा.ग.जगताप, ग.ल.ठोकळ, रियासतकार सरदेसाई, सेतुमाधवराव पगडी, डॉ.वा.भा.पाठक, बाबासाहेब पुरंदरे, म.म. द.वा.पोतदार द.रा. बेंद्रे, श्री.म.माटे, आबासाहेब मुजुमदार, कवी यशवंत, डॉ. के.ना. वाटवे, आनंदीबाई शिर्के, डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे, वगैरे. या सर्वांच्या सहवासात साहित्यिक चर्चा घडत, इतिहासविषयक विवेचने होत असत. वडिलांशी (कृ.भा. बाबर यांच्याशी) देखील कितीतरी वेळा सरोजिनी बाबर यांची सांगोपांग चर्चा होत असे. बाबर यांचा लिहिता हात अत्यंत सुंदर अक्षरात कागदावर अहोरात्र सरसर लिहित राहिला.
!!भूषविलेली पदे सन्मान व पुरस्कार !!
१)२५ मे १९८४ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे गौरव
२)५ फेब्रुवारी १९८२ ला राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
३)(टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’ (२३ डिसेंबर १९९७)
४)७ सप्टेंबर १९९७ ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार
५)३० जानेवारी १९९२ ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार
६)२६ एप्रिल २००७ ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव
७)१० फेब्रुवारी २००८ ला पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार
७)२३ ऑक्टोबर १९९७ ला पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
८)पिंपरी चिंचवड नगरपालिकडून गौरव
९)मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार
१०)१ ऑक्टोबर १९९५ ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
११)१२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार
डॉ.सरोजिनी बाबर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक:राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा