सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

!! ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन लोकार्पण सोहळा !!

 !! ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन लोकार्पण सोहळा !!




  आज सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी आपल्या गावचे  वापी पिगमेंट्स प्रा. ली तसेच निर्भय रसायन प्रा.लीचे मॅनेजर श्री चंद्रकांत काळंगे (शशिकांत निवृत्ती काळंगे यांचे ज्येष्ठ बंधू) यांनी कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन आपल्या गावासाठी अर्पण केली. या मशीनचा स्वीकार गावच्या सरपंच सौ. रसिका काळंगे  यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत केला.

       यावेळी चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांच्या हस्ते शशिकांत काळंगे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदरच्या मशीन ग्रामपंचायतीत राहणार असून त्याचा उपयोग करण्यासाठी डॉ. अनिल पवार (९९६०६३०७९४), डॉ. महेश पवार (९९६०४९१८५०) डॉ.संदीप चव्हाण (९०४९६३४५००) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यास संबंधित डॉक्टर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा. ग्रामपंचायत कर्मचारी सचिन धस्के (८४५९५८७६०२), संतोष जाधव (९७६७५८२७६६ ) या दोहोंवर मशीन देवाण-घेवाणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

        तरी गरजुनी या विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा. आपल्या आप्तस्वकीयांचे प्राण वाचवावेत. गावच्या विकासात  ग्रामस्थांचे सहकार्य असते. आपण कामाशिवाय बाहेर पडू नका, सुरक्षित राहा. आपण सर्वजण कोरोनाला हरवूया, गावाला विकासाच्या मार्गावर नेऊया.

  शब्दांकन : राजेंद्र पवार 

      ९८५०७८११७८

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

!! भूमिपूजन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लोकार्पण समारंभ !!

 

!! भूमिपूजन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लोकार्पण समारंभ !!





       आज २२ सप्टेंबर यादिवशी १४ व्या वित्तआयोगातून मंजूर झालेल्या कामाचा भूमिपूजन समारंभ सामाजिक अंतर पाळून गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. रसिका काळंगे  व उपसरपंच अशोक भोसले यांच्या हस्ते व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
          मंजूर कामामध्ये ग्रामपंचायत ते आबापुरी फाटा रस्ता काँक्रीटीकरण अंतर ३५० मीटर, त्याचबरोबर स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवणे आदी कामाचा समावेशआहे.
         सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध करणे गरजेचे आहे. आपल्या गावातील  लोकांचे ऑक्सिजनअभावी बळी जात आहेत. वेळेत उपचार मिळत नाहीत.ग्रामस्थांची अडचण विचारात घेऊन महेश आनंदराव चव्हाण (दयानंद चव्हाण -मिस्त्री) यांच्या बंधूनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  मशीन ग्रामपंचायतीस भेट दिली.या मशीनचा स्वीकार प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वर्णे येथील आरोग्य सेवक सुधाकर बोधे यांनी केला. सदरची मशीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात असणार आहे. यापुढे कोणाला श्वसनाचा त्रास जाणवला तर आपण डॉ.बोधे यांच्याशी संपर्क साधावा. ही सेवा विनामूल्य आहे.
     आजच्या दिवशी काँक्रीटीकरण रस्ता, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक, बौद्ध वस्तीत गटर बांधकाम आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सर्व कामामुळे गावच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे असे वाटते.
  शब्दांकन : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८
     

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

!! पद्मश्री शाहीर साबळे जन्मदिन !!(३ सप्टेंबर )


!! पद्मश्री शाहीर साबळे जन्मदिन !!(३ सप्टेंबर )





कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे जन्म: ३ सप्टेंबर१९२३ मृत्यू :  २० मार्च, २०१५) शाहीर साबळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या छोट्या खेडेगावी झाला. ते एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले.

          शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अंमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.

            पुढे तरुणपणी इ.स. १९४२ ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वत:ला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वत:चा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता.शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती 'तोफ' होती..

               समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्‍तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. मुक्त नाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले.

           इ.स. १९४२ मध्ये शाहीर साबळे स्वदेशी मिलमधे नोकरीला लागले, पण तिथेही रमले नाहीत. त्यांनी नोकरी सोडली आणि ते साने गुरुजींबरोबर त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत सामील होऊ लागले. त्यांच्याच आशीर्वादाने साबळेंनी ’शाहीर साबळे आणि पार्टी’ स्थापन केली.

           लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली. या अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते अशा कलाप्रकारांतून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणार्‍या 'महाराष्ष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. आचार्य अत्रे, पंडित जवाहरलाल नेहरू, बाळ ठाकरे, लता मंगेशकर आदी अनेकांनी शाहीर साबळे यांचे  कौतुक केले.

!!शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार !!

१)अखिल भारतीय मराठी शाहिरी

  परिषदेचे अध्यक्षपद

२)अखिल भारतीय मराठी नाट्य

  संमेलनाचे अध्यक्षपद 

३) पद्मश्री पुरस्कार

४)भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी

   म्हणून रशियाचा दौरा करणार्‍या

    पथकात सहभाग

५)महाराष्ट्र सरकारचा पहिला शाहीर

 अमर शेख पुरस्कार

६)दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा

   पुरस्कार

७)संत नामदेव पुरस्कार

८)महाराष्ट्र गौरव पुरस्कार

९)पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव

  पुरस्कार

      शाहीर साबळे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

   शाहीर साबळे यांनी गायलेले "जय जय महाराष्ट्र माझा" हे गीत ऐकण्यासाठी यु ट्यूबची लिंक देत आहे. आपण गीताचा आनंद घ्यावा.

    संकलक: राजेंद्र पवार

        ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...