बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन !! (९ ) Rajasthan Tour

!!  राजस्थान सहल  - प्रवास वर्णन !! (९ )
 आज ४ डिसेंबर, आमचा मुक्काम उदयपूर मध्येच असल्याने सकाळी सकाळी लवकर तयार होऊन साईटसीनसाठी बाहेर पडलो.आम्ही प्रथम फतेहसागर तलाव पाहिला. या तलावात बोटिंगही केले.फतेह सागर हा तलाव महाराणा फतेहसिंह यांनी बांधला.त्यांच्या नावावरुन तलावाला फतेह सागर हे नाव पडले.या तलावामध्ये सुंदर महाल देखील आहे.
        फतेहसागर तलावापासुन जवळच सहेली कि बाडी(मैत्री गार्डन) हे अतिशय विलोभनीय ठिकाण आहे. ही बाग राजपरिवारतील स्त्रियांसाठी बनवलेली आहे. या बागेची गणना देशातील सुंदर बागेमध्ये होते. या बागेत कारंजे,कमळ तलाव,संगमरवरी हत्तीच्या प्रतिकृती आहेत.येथील कारंज्यामुळे श्रावण महिन्यासारखे वातावरण तयार होते.फुलांची आकर्षक रचनादेखील येथे पहायला मिळते.
          संपूर्ण राजस्थानमध्ये कला, संस्कृती यांचे सुंदररित्या जतन केलेले आहे. या कला टिकुन राहाव्यात यासाठी भारतीय लोककला मंडळाची स्थापना १९५२ मध्ये करण्यात आली. याठिकाणी आम्हास कठपुतळीचा खेळ दाखवण्यात आला. बाहुल्यांच्या माध्यमातून एखादा प्रसंग लोकांपर्यंत किती सहजपणे  नेता येतो हे लक्षात आले.
          उदयपूरमध्ये सिटी पॅलेस हे महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. हा पॅलेस राजा उदयसिंह यांनी १६ व्या शतकात बांधण्यास सुरुवात केली. या राजवाड्याच्या निर्मितीसाठी २२ राजांनी हातभार लावला. तरीही हे काम एकाचवेळी झाल्यासारखे वाटते. येथे वयोवृद्ध व दिव्यांग लोकांना नेआण करण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या पहावयास मिळतात.
           दुपारच्या जेवणानंतर येथूनच जवळ असणाऱ्या हल्दीघाटी येथे गेलो.येथे महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित सुंदर प्रदर्शनी निर्माण करण्यात आली आहे. महाराणा प्रताप यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय आहे.हल्दीघाटीच्या युद्धाचा जिवंत प्रसंग चित्रफितीद्वारे दाखवला जातो. हल्दीघाटीचे युध्द १८ जून १५७६ ला झाले. तीन हजार घोडेस्वार व ४०० भिल्लाच्या जोरावर अकबराच्या सैन्याशी  महाराणा प्रताप यांनी लढा दिला. या युध्दात अनेक सैनिक कामी आले.रक्ताचे जणु पाट वाहत होते. याचवेळी पाऊस पडल्याने रक्ताचा तलावचा निर्माण झाला होता.
            यावेळी अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह करत होता. महाराणा प्रताप आपल्या चेतक घोड्यावर स्वार होऊन मानसिंह
  याच्याशी लढत होता. चेतक घोड्याने उंच उडी घेऊन हत्तीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मानसिंह  केवळ अंबारीतून खाली वाकल्यामुळे वाचला मात्र यावेळी चेतक घोड्याचा पाय कापला गेला. अशाही स्तिथीत चेतक  राणा प्रतापला घेऊन  दूर गेला .बावीस फुटाचा नालादेखील  त्याने ओलांडला. मात्र नंतर चेतक कोसळला. त्याने आपले प्राण सोडले. या घटनेने राणा प्रतापचे मन हेलावले. कोणत्याही परिस्थितीत मोगलांना नमवायचे यासाठी त्यांनी प्रतिज्ञा केली. राजा साधे जीवन जगु लागला. ध्येयप्राप्तीसाठी ऐहिकसुखाचा त्याग केला.महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यात मला खूप साम्य  वाटते.
        आज कला,संस्कृती,वास्तुशैली,प्राचीन इतिहास, स्वामिनिष्ठा याबाबत खूप माहिती मिळाली.आपणही संस्कृती संवर्धन करणे, इतिहासाचे जतन करणे यासाठी प्रयत्न करुया असे मला वाटते.
      प्रवासवर्णन -- राजेंद्र पवार
               ९८५०७८११७८





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...