शनिवार, ६ जुलै, २०१९

!!पाऊले चालती पंढरीची वाट !!  (१२  )
       आज बरडहुन पालखीचे प्रस्थान सकाळी ६.३० वाजता झाले.पालखीचे प्रस्थान होतानादेखील बरडवासीयांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता पालखी राजुरी जवळील साधुबुवाच्या मंदिराजवळ आली.हे ठिकाण साधुबुवाचा ओढा म्हणून प्रसिद्ध आहे. साधुबुवाच्या मंदिरापासून शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे दर्शन होते.साधुबुवाच्या ओढ्यापासून शंभू महादेव मंदिर १८ किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी दिंडी क्र.३ साठी मठाचीवाडी येथील दत्ता पवार यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.






        राजुरीजवळ वारकर्यांना आंघोळ करण्यासाठी काही ठिकाणी सुंदर व्यवस्था केली होती त्याचा फायदा अनेक वारकरी घेत होते. राजुरीनंतर पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होतो. ग्रामपंचायत धर्मपुरी, माळशिरस तालुका व सोलापूर जिल्हा प्रशासनाचे वतीने माऊलींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच पुन्हा एकदा निरा उजवा कालवा लागला. पाणी असणारा भाग हिरवागार तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ओसाड माळरान दिसत होते. दुपारचा विसावा कारुंडे (बंगला) याठिकाणी होता. येथे भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या परिसरातुन पालखी जात असताना विविध पीकपद्धती पाहण्यास मिळाली. त्यामध्ये मिश्र फळबागा, ऊस शेती, भाजीपाला शेती,केळीची लागवड पाहण्यास मिळाली. थोडक्यात येथील शेती समृद्ध वाटली.
       दुपारनंतरचा विसावा पानस्करवाडी येथे होता. आज वातावरण खूपच आल्हाददायक होते त्यामुळे दिंडीत चालताना कोणताही त्रास जाणवला नाही.बरड नातेपुते मार्गावर वारकऱ्यांना पिठलं भाकरी,बिस्किटे, केळी, चहाचे वाटप केले जात होते. संध्याकाळी ६ वाजता पालखी,पालखी तळावर पोहोचली.आजही दिंडी क्र.१० ने आपला गजर थांबवला नाही.त्यांचे म्हणणे चोपदाराने  ऐकून घेतले. चोपदाराने हरवलेल्या व सापडलेल्या जिन्नसांचा उल्लेख केला.दुसऱ्या दिवशी पालखीचे प्रस्थान कधी होणार आहे हे सांगितले गेले. आज पालखी मार्गावर सर्वत्र गर्दी होती. नातेपुतेमध्ये पालखीचे उत्साहात स्वागत केले गेले.
          आजची निवास व्यवस्था ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा,नातेपुते ने तर भोजन व्यवस्था त्याच पतसंस्थेचे प्रतिनिधी भीमराव बर्वे यांनी केली होती.
          आज पालखीमध्ये काही अंध,अपंग व्यक्ती वारी करताना दिसून आल्या. आमच्याच दिंडीमध्ये पाथर्डी येथील मुकुंद महाराज जाठदेवळेकर चालतात.ते अंध आहेत. आज त्यांचे वय ७६ वर्षाचे आहे .ते नेहमीच पायी वारी करतात .गतवर्षी त्यांची पंच्याहत्तरी आळंदी येथे साजरी केली होती. त्यावेळी साडेसात हजार  वाचक ज्ञानेश्वरी पारायनासाठी हजर होते. मलाही या कार्यक्रमात हजेरी लावता आली होती.अपंग व्यक्ती व्हील चेअरवर मार्गक्रमण करताना दिसुन आल्या. एक व्यक्ती तर वॉकर घेऊन चालत होती. थोडक्यात आपल्या अपंगत्वावर मात करून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या अपंग व्यक्ती जात आहेत. आपण बऱ्याचवेळा काम करताना सबबी सांगतो,काम कसे टाळता येईल असे पाहतो. परंतु जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर ते काम तडीस नेले जाते.पांडुरंगही त्यांना शक्ती देतो.
           वारीतील अपंग व्यक्तींच्या सहभागावरून असे वाटते की, आपण कोणतेही काम करताना सबबी सांगु नयेत. प्राप्त परिस्थितीत मार्ग कसा काढता येईल हे पाहावे असाच संदेश आपणास  मिळतो.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...