राम कृष्ण हरी, दिनांक ११ जूनला आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. यावर्षी इच्छा असूनदेखील शिवकृपा पतपेढीच्या निवडणुकीमुळे पालखी सोहळ्याचा सुरुवातीपासून आनंद लुटता आला नाही. आज २६ जूनपासून मात्र आम्ही माळशिरस तालुक्यातील वेळापूरहून पालखी सोहळ्यात सहभागी झालो. काल रात्री आमच्या मुक्कामाची सोय शिवकृपाच्या माळशिरस शाखेतील शाखाप्रमुख भरत जगदाळे यांनी आपल्या बंधूच्या घरी केली होती.
आज पालखीचे प्रस्थान सकाळी सहा वाजता झाले. आम्ही रथापुढील दिंडी क्रमांक तीनमध्ये चालत आहोत. सकाळी साडेआठच्या दरम्यान उघडेवाडी येथील गोल रिंगण असणाऱ्या ठिकाणी पोहोचलो. रिंगणात दोन अश्व धावत असतात. एका अश्वावर शितोळे सरकारांचे प्रतिनिधी आरुढ होतात तर त्यापाठीमागे माऊलींचा अश्व धावत असतो. दोन्ही अश्व धावत असताना सर्व वारकरी "माऊली, माऊली"असा गजर करत होते. अश्व धावलेल्या जागची माती आपल्या कपाळी वारकरी लावत होते.या गोल रिंगणानंतर सकाळचा विसावा झाला.या विसाव्यानंतर थोड्याच वेळात तोंडले - बोंडले ही गावे आली. तोंडले गावी विसाव्याच्या ठिकाणी एक पोलीस ड्युटीवर असताना टाल मृदंगाच्या तालात तल्लीन असताना दिसून आले. आपले कर्तव्य बजावत असतानादेखील नामस्मरण करता येते हेच या पोलिसाने दाखवून दिले. तोंडले या गावातूनच एक ओढा वाहतो त्यास नंदाचा ओढा म्हटले जाते. येत पूर्वी ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ येथे स्नान करताना एकमेकांना चिंब करत, आज परिस्थिती बदलली आहे.ओढ्यावर पुल झाला आहे.मात्र शावरच्या साह्याने वारकऱ्यांच्या अंगावर पाणी उडवले जाते. मात्र जुना फिल काही येत नाही.तोंडले गावी ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांच्या पालख्या एकत्र येतात. इतकेच नव्हे तर दुपारनंतर सोपानकाका व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्याच्या भेटी होतात. ही भेट बंधू भेट म्हणून प्रसिध्द आहे.
आज आपण अनेक भावाभावामध्ये सख्य नसल्याचे पाहतो पण आजचा बंधू भेटीचा सोहळा पाहिल्यानंतर दोन बंधूमधील सबंध कसे असावेत हेच स्पष्ट होते. आपण प्रत्येकाने बंधूभाव वाढीसाठी प्रयत्न करावेत असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा