!! वारी पंढरीची २०२३ !! ( २७ जून )
आमचा २६ चा रात्रीचा मुक्काम भंडी शेगाव येथील ज्ञानेश्वर यलमार यांच्या घरी होता. तिथीनुसार पालखीच्या आगमनादिवशी ज्ञानेश्वरचा वाढदिवस साजरा केला जातो,आम्ही सर्वांनी वाढदिवस उत्साहात साजरा केला. आज पालखीचे प्रस्थान दुपारी एक वाजता असल्याने सकाळचे स्नेहभोजन (प्रसाद ) भंडी शेगाव येथे घेतले. आजच्या प्रसादाचे नियोजन ज्ञानदीप सहकारी पतसंस्था, शाखा पंढरपूर यांनी केले होते.आज आम्ही दीड वाजता पालखी सोहळ्यात सहभागी झालो. सर्वत्र पालखी मार्गावर ज्ञानबा तुकारामाचा जयघोष ऐकायला मिळत होता.आज मार्गावर दोन रिंगणे झाली.
पहिले उभे रिंगण तर दुसरे गोल रिंगण, गोल रिंगण बाजीरावाच्या विहिरीजवळ झाले. रिंगणात दोन अश्व धावत असतात पैकी एका अश्वावर माऊली आरुढ झालेल्या असतात असे मानले जाते. गोल रिंगणसोहळा खूपच लक्षवेधक होता. वारकऱ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. वारकऱ्यांना खरतर पावसाची प्रतिक्षा होती.पण आजपर्यंततरी नाराजच केले आहे.
पालखी सोहळ्यात चालत असताना वारकऱ्यांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. जागा मिळेल तिथे राहावे लागते. वेळीअवेळी जेवण करावे लागते. ऊन पाऊस असा सामना करावा लागतो.या सर्व बाबींमुळे प्रकृतीच्या तक्रारी वाढतात. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक मेडिकल कॅम्प आयोजित केले जातात. अशाच वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबईच्या मोफत वैद्यकीय सेवा केंद्राला भेट देण्याचा आज योग आला.
वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट गेले तीस वर्षे वारकऱ्यांना सेवा देत आहे."जेका रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" याचा प्रत्यय आज आला. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट ज्ञानेश्वर माऊली, सोपानकाका, तुकाराम महाराज या पालखी सोहळ्यासाठी सेवा देत असतात. याशिवाय महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी, सिद्धिविनायक मंदिरात वेळीवेळी सेवा देतात.
या चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी विजय कासूर्डे यांच्यावर आहे. यावेळी डॉ. सुधीर करपे, डॉ. प्रमोद इंगळे, डॉ. विजय घुटूगडे, डॉ. अरुण काळे, डॉ. नरेंद्र कदम, डॉ.रॉय पाटणकर, डॉ.रमेश चौधरी, डॉ. हळूरकर,डॉ. सौ. हळूरकर हे सेवा देताना दिसून आले. रुग्णांची तर खूप गर्दी होती.
वारकऱ्यांची सेवा हीच खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा होय. "जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा होय". असे म्हटले जाते. आपणही समाजातील गरीब, गरजूना मदत करायला हवी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८