शनिवार, ४ जून, २०२२

समाजासाठी काम केलेली माणसेच चिरंतन स्मरणात राहतात - भास्करराव पेरे पाटील

 समाजासाठी काम केलेली माणसेच चिरंतन स्मरणात राहतात - भास्करराव पेरे पाटील

               एकसळ ता.कोरेगाव येथील माजी प्राचार्य मारुती भिकू तथा एम. बी.भोसले सरांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श ग्रामपंचायत पाटोदा जिल्हा औरंगाबादचे सरपंच श्री भास्कर पेरे पाटील म्हणाले की, राष्ट्रपुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी व्यथित केले त्यामुळे त्यांचे स्थान जनमानसात पक्के झाले. उदाहरण देताना ते म्हणाले की, महात्मा गांधी, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आपल्या स्मरणात आहेत परंतु आपल्या आजोबा, पणजोबा यांच्या जन्मतिथी किंवा मृत्यूचा दिवस आपल्या स्मरणात नाही. ज्यांनी आपल्याला घरदार दिले, जमीन जुमला दिला ते विस्मृतीत गेले कारण ते केवळ आपल्या कुटुंबासाठी जगले, समाजासाठी त्यांचे योगदान शून्य होते. म्हणून तुम्ही समाजासाठी जगा. उदरनिर्वाहापुरता पैसा आला की पुरे झाले पण आपली हाव काही संपत नाही.







             निस्वार्थीपणे केलेले काम माणसाला यशोशिखरावर पोहोचवते. पाटोदा गावाचा विकास कसा झाला हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन सांगितले. विकास करताना पैश्याची गरज असते. पाटोदा गावात घरटी पाच हजार रुपये निधी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गोळा होतो. या निधीमधून गरम पाणी, शुध्द पिण्याचे पाणी, चोवीस तास उपलब्ध असते. मोठया प्रमाणात फळ झाड लागवड, पीठ गिरणी, डाळ मिल,शेती कामासाठी सवलतीच्या दरात ट्रॅक्टर सुविधा कचरा गाडी, बंदिस्त गटार योजना, विवाह प्रसंगी वृक्षारोपण, १००% प्लास्टिक निर्मूलन, शौचालयाचा वापर असे अनेकविध योजना प्रभावीपणे राबवल्या जातात. आपण दिलेल्या निधीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सुविधा लोकांना मिळतअसल्याने कर भरण्यासाठी चढाओढ असते. नेहमी सकारात्मक विचार करावा, हे करु नका, ते करु नका असे म्हणण्याऐवजी एखादी गोष्ट अशी करा असे सांगायला हवे. याबाबत उदाहरण देताना ते म्हणाले की, बऱ्याच कार्यालयात येथे थुंकू नका अशा पाट्या असतात, नेमके कोठे थुंकायचे हे सांगायला हवे. अशी पाटी पाहिल्यानंतर त्यांनी गावात ३२ ठिकाणी वॉश बेसिन बसवली आणि तेथे चोवीस तास पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आणि येथे थुका असे लिहिले.

            पाटोदा हे गाव देशातील पहिल्या पाच गावातील आदर्श गाव होय. आमच्या गावाकडे रोल मॉडेल म्हणून पाहिले जाते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या गावाचा भूतपूर्व राष्ट्रपती ए .पी. जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मान झाला. चांगलं काम केले की, पैस्याची कमतरता भासत नाही हे आमच्या गावाने सिध्द करुन दाखवले आहे. असे भास्कर पेरेपाटील प्रत्येक गावात तयार झाले महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही हे निश्चित.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत, ज्येष्ठ लेखक सातारा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे  सर होते. त्यांनी श्री एम. बी. भोसले सर यांचे शैक्षणिक कार्य, सहकारामधील तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेतला. एम. बी.सरांसारखी माणसे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत होती त्यामुळे संस्थेचेही नाव उंचावले आहे. संस्थेनेही त्यांना आजीव सेवक पद बहाल करुन त्यांचा सन्मान केला होता. समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी एम. बी. भोसले सरांसारखी माणसे गावागावात असायला हवीत असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले.

         सुरवातीला  ऍड. पी.सी.भोसले यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगडी गावची सुकन्या कु.संपदा जगताप हिने केले. आभार ऍड श्री.अनिल भोसले यांनी मानले यावेळी शिवानंद भारती महाराज, राजेंद्र शेलार, अरुण माने सर, राजेंद्र पवार सर, मॉडर्न चे प्राचार्य श्री शिवाजी शिर्के सर, माजी प्राचार्य दत्तात्रय महाजन सर, खालापूरचे उपनगराध्यक्ष राजेश पार्टे, व्ही टी चव्हाण सर, माजी सरपंच विठ्ठल भोसले, कॅप्टन महादेव भोसले, वर्णेचे माजी सरपंच धैर्यशील पवार, रामचंद्र निकम, सोसायटीचे माजी चेअरमन हणमंतराव पवार, युवा नेते अभिजित पवार तसेच जिल्हा भरातून  भोसले सरांच्यावर प्रेम करणारी मंडळी व एकसळ ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

    राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...