!!राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृती वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार रहिमतपुरच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेला प्रदान सोमवार दिनांक २७ मे !!
रहिमतपूर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सातत्यपूर्ण व वैविध्यपूर्ण राबवत असलेल्या उपक्रमांची दखल घेऊन या शाखेला पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर व महाराष्ट्र साहित्य परिषदचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे याच्या शुभहस्ते म.सा. प.शाखा रहिमतपूरचे अध्यक्ष अरुण माने यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माझ्यासह रहिमतपूर शाखेचे पदाधिकारी (कार्याध्यक्ष ) रुपेश जाधव, सचिव शिवाजी माने, कोषाध्यक्ष डी. एम. भोसले कवी गिरीश यांचे नातू अरुण कानेटकर, सदस्य महिपतराव माने, सौ. अर्चना नाईक, क्षितिज उगलमोगले, सत्यवान शिर्के, अनिरुध्द नाईक, शत्रुघ्न मोहिते, राजेंद्र वाघ, संतोष राऊत, अनुराधा झांजुर्णे, उद्योजक सदाशिव बोराटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातच संत तुकाराम महाराजांच्या " आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने"या अभंगाने झाली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव व डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार अनुक्रमे विज्ञान लेखक डॉ.निरंजन घाटे, किशोर बेडकिहाळ, अरुण इंगवले, सुरेश देशपांडे, पद्माकर कुलकर्णी आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष पदावरुन बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की, समाज विज्ञाननिष्ठ व्हावा ही भारतीय लोकशाहीची पहिली अट आहे. आणि असा समाज निर्माण करण्याचे काम निरंजन घाटे यांच्या लेखनाने केले आहे. त्यांनी जवळपास २०० पुस्तकांचे लेखन केले आहे. आपली नाळ ही नेहमी समाजाशी असली पाहिजे, ज्यांची समाजाशी नाळ आहे ते मुक्तपणे लिहू, बोलू आणि विचार व्यक्त करु शकतात.साहित्याची निर्मिती ही समाजातील दुःख, दारिद्र्य, व्यथा,वेदना पाहिल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारल्या शिवाय होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील लेखकांनी मुक्तपणे लिहावं यावर काही वादंग निर्माण झाल्यास महाराष्ट्र साहित्य परिषद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही त्यांनी आश्वासीत केले.
या कार्यक्रमात डॉ.नितीन करमळकर, किशोर बेडकिहाळ, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिवाजीराव कदम, राजीव बर्वे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय कानडे तर आभार सुनिताराजे पवार यांनी मानले. आज खऱ्या अर्थाने साहित्यिकांचा सत्संग लाभला. आपला देश पुरोगामी विचारांचा व्हावा यासाठी आपण सर्वजणच प्रयत्न करुया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा