!! चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांचा आज जन्मदिन !!(१४ मे)
आपल्या वर्णे गावचे सुपुत्र मानसिंग पवार यांचा आज जन्मदिन, आजच्याच दिवशी १४ मे १९५१ रोजी त्यांचा जन्म झाला होता. आज त्यांचा ७१ वाढदिवस, मानसिंग पवार यांना वर्णेकर ग्रामस्थ आदराने "बापू" असे म्हणतात.
बापूंच्या विषयी थोडीसी माहिती आपण जाणून घेऊया. मानसिंग पवार ग्रामीण महाराष्ट्राचे रोल मॉडेल आहेत. ग्रामीण भागातून जावून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी आपल्या आवाजाने मोहिनी घातली. त्यांनी शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना समृध्द आणि आनंदी करण्याचे मोठे काम बापूंनी केले. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांना चित्रपट क्षेत्राची आवड होती. त्यांनी ७ मराठी चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन केले असून ते चित्रपट खालीलप्रमाणे
१)पोलिसाची बायको
२)सातबारा
३)थोरली बहीण
४)एकांत
५)नाईट स्कुल
६)चल गजा करु मजा
७)बुगडी माझी सांडली ग
मानसिंग पवार यांनी अनेक शेतीविषयक मालिकांचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. त्या पुढीलप्रमाणे': १)असे पाहुणे येती २)प्रपंचमाया ३)इन्स्पेक्टर प्रताप ४)सुजन वाक्य कानी पडो ५)गप्पा गोष्टी ६)तंत्र नव्या शेतीचे ७)सर्जा राजा ८)शुभ मंगल सावधान ९)सुजलाम सुफलाम ९)भूमी १०) स्वच्छतेकडून समृद्धीकडे ११)वृत्त वेध १२)उद्योग लक्ष्मी १३)खेतसे बजारतक
"आमची माती आमची माणसं" ह्या मालिकेतील त्यांचे सह्याद्री वाहिनीवरील संध्याकाळी ६.३० चे निवेदन सर्वांना भुरळ पाडणारं होतं. सर्जा राजा ही त्यांची अतिशय गाजलेली मालिका, आजही सर्जा राजा नुसतं नाव काढले तरी मानसिंग पवार यांची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. या मालिकेतून शेतकऱ्यांचे बैलाविषयी असणारे भावनिक प्रेम व्यक्त केले आहे. या मालिकेतील मधू कांबीकर, उदय म्हैसकर यांचे काम आजही लोकांच्या स्मरणात आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनाने राबवले होते. या अभियानातील बक्षीसपात्र गावांच्या यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम मानसिंग पवार यांनी केले आहे.
आज पवार साहेबांच्या नावावर ४ नाटके देखील आहेत. त्यांनी विविध जाहिरातीसाठी आपला आवाज दिलेला आहे. एखाद्या कृषी प्रदर्शनास आपण भेट दिली तर सर्वत्र मानसिंग पवार यांचा आवाज कानी पडतो. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्याशी त्यांचे खूप जवळचे नाते होते. त्यांनी एक हजारपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रम केलेले आहेत तर दूरदर्शनवर राज्यातील अनेक नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.
मानसिंग पवार यांची कर्मभूमी मुंबई असली तरी आपल्या जन्मभूमीबद्दल खूपच प्रेम आहे. वर्णे येथील फूल शेतीचे ते किमयागार आहेत. त्यांच्यामुळे वर्णे हे फुलांचे गाव म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर ओळखले जात होते. शेती, शिक्षण, आरोग्य हे त्यांच्या आवडीचे विषय. वर्णे ग्रामविकास मंडळ, मुंबई या स्थानिक शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. आजही ते विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. आजही ते शेतीत विविध प्रयोग करत आहेत.
सुरुवातीच्या काळात मानसिंग पवार हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरमध्ये जनसंपर्क व्यवस्थापकपदी कार्यरत होते. त्यांनी आपल्या सेवकाळात आरसीएफ ला खूप उंचीवर नेऊन ठेवले होते. त्याचा परिपाक म्हणून सेवानिवृत्तीनंतरचा २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर देखील त्यांना प्रतिष्टेचा "जीवन गौरव" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्याला तत्कालीन सहा. कार्यकारी संचालक, अध्यक्ष यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. निवृत्तीनंतर २५ वर्षांनी देखील एखाद्या व्यक्तीची व्यवस्थापन दखल घेते यातच त्यांची महनीयता दिसून येते.
मानसिंग पवार यांच्या संसारवेलीवर अनु आणि रणजितच्या रुपाने दोन फुले उमलली. मला याप्रसंगी रणजितबद्दल थोडीसी माहिती सांगितलीच पाहिजे. अर्थमंत्रालयाच्या सेबी या संस्थेसाठी काम करणाऱ्या व सेबीला सल्ला देणाऱ्या डेटा कमिटीवर रणजित पवार काम करत आहेत. तसेच नुकतीच रणजित पवार यांची लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप वर दक्षिण आशियायी देशांसाठी माहिती संकलन आणि विश्लेषण या विभागासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. आपल्या गावाच्यादृष्टीने ही बाब भूषणावह आहे.
" कर्म हीच पूजा" हा मूलमंत्र जपणारे, सतत प्रगतीचा ध्यास असणारे, शेतकऱ्यांना आनंदी व प्रगत बनवणारे असे मानसिंग पवार यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा