!! आमची नर्मदा परिक्रमा !!(६७ )
आमचा कालचा मुक्काम सिहोर जिल्ह्यातील नारायणपूर गावातील पॉवर हाऊसजवळील अन्नक्षेत्रात होता. याठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याने सगळ्यांनी कपडे धुण्याचा आनंद लुटला. आश्रमातील सुविधा खूपच चांगली होती. आज आम्ही लवकर चालण्यास सुरुवात केली. धुकं जास्त पडलेले असल्याने ५० फुटांपेक्षा जास्त अंतरावरचे दिसत नव्हते. सकाळी लवकरच रायसेन जिल्ह्यातील भारकच्छ कलान येथील मा. नर्मदा धर्मशाळेत पोहोचलो. या धर्मशाळेत (आश्रमात ) महेश शर्मा अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत.
सध्या परिक्रमेत असणारे आमचे स्नेही गोरख चव्हाण यांचा त्यांचेशी पूर्व परिचय होता. शर्मा साहेबांच्या कामाची गोरख चव्हाण यांना पूर्ण माहिती असल्याने बराच सत्संग घडून आला. चर्चेत आलेल्या काही बाबी मुद्दाम आपणापुढे ठेवाव्यात असं वाटतंय.
*मा नर्मदा कुणालाही परिक्रमेस बोलवत नाही. संकल्प उचल्यानंतर नर्मदा आपली माता व आपण तिचे बालक बनतो.
* परिक्रमेत भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या जातात.
*नर्मदा परिक्रमा भक्ताची दशा व दिशा बदलून टाकते.
*भगवान विष्णू उत्तर तटावर तर दक्षिण तटावर प्रत्यक्ष महादेव भक्तांची काळजी घेतात अशी भाविकांची श्रध्दा आहे.
* रामचरित मानस या ग्रंथपठणाचा प्रभाव त्या कुटुंबावर जास्त जाणवला.
उदाहरण द्यावयाचे झाले तर त्यांच्या मुलीने स्वतःच्या विवाहादिवशी रामचरीत मानस याचे वाचन केले होते. त्यांचे जावई इंडिगो एअर लाइन्समध्ये काम करतात. विमान प्रवासाचा प्रसंग त्यांनी सांगितला. दोघांना विमानाने जायचे होते. विमानात जास्त सामान चालत नाही. रामचरीतमानस हा ग्रंथ मुलीबरोबर होता. हा ग्रंथ बरोबर घेऊ नये हा जावयाचा आग्रह होता. पण मुलींने ग्रंथाशिवाय प्रवास त्याज्य मानला. हे कुटुंब उच्च विद्याविभूषित वाटले. शेतीतसुध्दा या कुटूंबाने खूपच प्रगती केली आहे. त्यांच्याकडे ७५ एकर शेती असावी. शेतीबाबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, सध्या ४० एकरावर हरबरा,३२ एकरावर गहू तर उर्वरित क्षेत्रात फळ बाग आहे.आमच्याकडे भात पीक मोठ्या प्रमाणावर असते. गतवर्षीचा विचार केला तर त्यांना ७०० क्विंटल भात तर ७०० क्विंटल गहू झालेला होता.
या उत्पन्नातूनच आम्ही परिक्रमावासीयांची सेवा करीत असतो. त्यांच्या आग्रहामुळे आम्ही आज भारकच्छ कलान येथे थांबलो आहे. हा भाग भात शेतीसाठी प्रसिध्द आहे. आज काही ठिकाणी भाताची पोती भरावयाचे काम चालले होते. पुसा जातीचा भात होता.२७००/- रुपये दराने भात जागेवर विकला होता. या भागात भाताच्या गिरण्याही भरपूर आहेत त्याविषयी माहिती आपण नंतर बघूच. आज वाटेत नांदनेर व कुसुमखेडा ही गावे लागली. सकाळी कुसुमखेडा गावात अनिकेतसिंह राजपूत यांनी दुधाची सेवा केली. या सेवा आम्ही विसरु शकत नाही.
संत सावता माळी यांच्यासारखे, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असा,ते काम परमेश्वराचे नामस्मरण करीत करा. आपण श्रध्दापूर्वक काम केले तर यश निश्चित येते. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असा ते काम आपण श्रध्दापूर्वक ,प्रामाणिकपणे करावे त्यातच आपलं तसेच समाजहित आहे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा