बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !( ८२ )

!! आमची नर्मदा परिक्रमा !( ८२ ) १६ फेब्रुवारी - ३६ किलोमीटर 

             आमचा कालचा मुक्काम डींडोरी जिल्ह्यातील विक्रमपूर येथे होता. विक्रमपूर येथील मा.शारदा ट्रेडिंग कंपनीचे मालक आशिष गुप्ता व नम्रता गुप्ता हे पतीपत्नी परिक्रमावासीयांसाठी सेवा देत आहेत. ते स्वतःच्या घरी स्वयंपाक करुन लोकांना खाऊ घालत असतात. एखाद्या दिवशी लोकांची सेवा करणे वेगळे आणि रोज सेवा करणे वेगळे. पण मनात सेवाभाव असेल तर कसलाही त्रास वाटत नाही याचाच प्रत्यय त्यांच्या सेवेतून दिसून आला. आज सुरुवातीचा रस्ता चांगला असल्याने आम्ही लवकर चालण्याचा निर्णय घेतला. आज लवकर निघाल्याने छत्तीस किलोमीटर चाललो. 



      आज मार्गात नूनखान, धनगाव, धमनगाव, शाहपूर, जोगी टीकरिया, देवरा, लुकामपूर, लूटगाव ही गावे लागली. आमचा आजचा मुक्काम रामघाट येथे आहे. जबलपूरपासून जोगी टिकरियापर्यंत आम्ही सडकमार्गाने आलो आहोत. सडक मार्गाशिवाय येथे पर्याय नाही. चार दिवसाने पुन्हा आज नर्मदा मातेचे दर्शन जोगी टिकरिया येथे झाले. जोगी टिकरिया येथे महाराष्ट्रातून दोन बसेस आलेल्या होत्या. त्यापैकी बरचसे लोक परिचित निघाले. आज घरची माणसे भेटल्याचा खूपच आनंद झाला. जोगी टिकरिया येथे आम्ही  दुपारी स्नानाचा आनंद लुटला. तेथेच दुपारचा भोजन प्रसादही घेतला. आज आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दक्षिणाही मिळाली हेही मला सांगितलेच पाहिजे.


          आज धमनगाव येथे ज्ञानेश्वरी बी.एड. कॉलेज व शेजारीच जवाहर नवोदय विद्यालय पाहायला मिळाले. एक शिक्षक मुलांना ग्राऊंडवर मार्गदर्शन करत होते. या विद्यालयाची इमारत व संपूर्ण परिसर फारच लक्षवेधक होता. तुम्हाला थोडे जवाहर नवोदय विद्यालयासंबंधी सांगितलेच पाहिजे.


      जवाहर नवोदय विद्यालय ही स्व. राजीव गांधींची संकल्पना होती. १९८६ मध्ये ही संकल्पना वास्तवात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा विद्यालय निर्मितीमागचा मुख्य उद्देश आहे. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी पाचवीत स्पर्धा परीक्षा असते. सहावीपासून शाळा सुरु होते. ही मुले इयत्ता नववीत आल्यानंतर एका वर्षासाठी इतर राज्यात जावे लागते. इतर राज्यातील संस्कृती, राहणीमान, आचारविचार यांची ओळख व्हावी  हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हे शिक्षण घेत असताना पालकांना फारसा खर्च येत नाही. जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून देशाला आय.ए. एस, आय.पी.एस. आय. आर. एस. आय.एफ.एस. असे अधिकारी मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर राज्य स्तरावरदेखील अनेक अधिकारी मिळाले आहेत. "Come to learn & Go to serve". शिकायला या आणि सेवेसाठी जा. हे ब्रीदवाक्य या विद्यालयाचे आहे. सातारा जिल्ह्यासाठी खावली येथे जवाहर नवोदय विद्यालय असल्याचे आपणास माहीत आहेच.

     जवाहर नवोदय विद्यालयासारख्या अनेक स्पर्धा परीक्षा आहेत याची मुलांना ओळख करुन देणे त्या परीक्षांना मुलांना बसवणे हे आपलं प्रत्येकाचे काम आहे. आपण आपल्या परिसरातील मुलांना अशा परीक्षांची ओळख करुन देऊया, त्यांना परीक्षांची संधी देऊया, आपल्या भागातील प्रशासकीय अधिकारी कसे वाढतील यासाठी आपण सर्वजण जाणीवपूर्वक प्रयत्न करुया.

    राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८ 

#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar #धामणगाव #dhamangaon #ramghat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...