मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (३० ) पुरातन शिव मंदिर

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (३० ) पुरातन शिव मंदिर 

              आमचा कालचा मुक्काम श्री अंबिका धाम सेवा सत्संग ट्रस्ट संचालित भाडभूत येथील केवट आश्रमात होता. आश्रम परिसरात अनेक देवतांची पुरातन मंदिरे आहेत. पाऊल वाटेने चालवयाचे असल्याने आम्ही आज उशिरा चालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १० किलोमीटर अंतर  कधी शेतातून कधी नर्मदा किनाऱ्यावरुन पायवाटेने चालावे लागले.वाटेत वडवा, दशान ही गावे लागली. वाटेत कोठेच थांबण्याची चांगली सोय नव्हती त्यामुळे आम्ही वाटेत एका घराच्या ओसरीला थांबून आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या खाण्याच्या साहित्याचा आस्वाद घेतला. 









              सकाळी ११.३० वाजता कुकुरवाडा येथील त्रिगुणातीत ध्यान सेवा केंद्रात गेलो.  येथील शिवमंदिर व इतर देवतांच्या मूर्ती खूपच सुरेख आहेत .तेथेच दुपारचा भोजन प्रसाद घेतला. फारसी विश्रांती न घेता  दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भरुच शहराकडे मार्गक्रमण केले. भरुच शहरात खूपच आदराने आदरातिथ्य झाले. ठीकठिकाणी जेवणाचा आग्रह झाला. शहरात प्रवेश करताच श्री दिलीपभाई यांच्याकडे ताक प्यायलो. बऱ्याच ठिकाणी खाण्याचे पदार्थ व दक्षिणा मिळाली. शहरातील कामनाथ महादेव, दत्त मंदिर, शंकराचार्य मठ ,भ्रूगु ऋषी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.प्रत्येक ठिकाणी आपले आसन लावा, विश्रांती घ्या असाच आग्रह होत होता. सुरुवातीचा काही काळ जुन्या भरुच शहरातून जावे लागले तो परिसर अतिशय गलिच्छ वाटला. 

             आम्हाला शंकराचार्यांच्या मठाकडे यावयाचे होते, रस्ता काही लक्षात येत नव्हता दोन तरुण रस्त्यात भेटले असताना त्यांना मठाबाबतविचारणा केली असताना त्यांनी १०/१० रुपये द्या, रस्ता दाखवण्याची व्यवस्था करतो असे सांगितले हे काही आम्हास बरे वाटले नाही. वाटेत कृषी महाविद्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भव्य वास्तू पाहण्यास मिळाल्या. आज आम्हास गरजेच्या वाटणाऱ्या वस्तूंचीही खरेदी याच शहरात झाली. 


              भ्रूगु ऋषींनी येथे तप साधना केली असल्याने या शहराला "भरुच"असे नाव पडले असल्याचे आम्हास सांगितले. विस्तारित भरुच खूपच छान आहे. उशीरा नीलकंठ महादेव परिसरातील आश्रमात आलो .या आश्रमाचा परिसर खूपच मोठा आहे. आश्रमात भोजन प्रसादाची वेळ ठरलेली असते आपण उशीरा गेलो तर ते मिळण्याची शक्यता खूपच कमी असते त्यामुळे वेळ पाळणे गरजेचे असते.

     आपणही प्रत्येक काम वेळेत करावे. जीवनात वेळेला अनन्य साधारण महत्व द्यावे असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...