!! हुतात्मा शिरीषकुमार मेहता
स्मृतिदिन !! (९सप्टेंबर )
शिरीषकुमार मेहता जन्म:२८ डिसेंबर १९२६ मृत्यू:९ सप्टेंबर १९४२
नंदुरबार शहरात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले.
महात्मा गांधीनी ब्रिटिशांना ९ ऑगस्ट १९४२ ला "चले जाव "चा इशारा दिला होता. देशातील सर्व गावे, शहराप्रमाणे नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.
स्वातंत्र्य आंदोलनामुळे गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलांच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, "गोळी मारायची तर मला मारा . ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
स्वातंत्र्यआंदोलनात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहिदांचे आपण कायम स्मरण करायला हवे. आता देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न नाही. देशापुढे दारिद्रय, आरोग्य, शिक्षण यासारखे महत्वाच्या समस्या आ वासून उभ्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. माझ्यासह देशातील प्रत्येकाने आपला देश जगात महान व्हावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया.
शिरीषकुमार यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा