!! समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी
डॉ. ॲनी बेझंट स्मृतिदिन !!
(२० सप्टेंबर )
होमरूल लीगच्या संस्थापक डॉ.ॲनी बेझंट यांच्याविषयी माहिती
होमरुल म्हणजे आपला कारभार आपण करणे. यालाच "स्वशासन" म्हणतात. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक सनदशीर व शांततापूर्ण आंदोलन करणारी संघटना . ॲनी बेझंट ह्या आयरिश असल्यामुळे त्या वारंवार आयर्लंडला जात. आयर्लंडमध्ये १९०८–१३ दरम्यान होमरूलची चळवळ चालू होती. त्यामुळे त्यांना भारतातही स्वराज्यासाठी अशीच चळवळ सुरू करावी, असे वाटले. म्हणून त्यांनी भारतातील चळवळीला ‘होमरूल लीग’ हे नाव दिले. ‘होमरूल’चा शब्दशः अर्थ स्वराज्य असा असून या काळात भारताच्या राजकीय नेतृत्वात एक प्रकारची शिथिलता आली होती. या वेळी ॲनी बेझंट यांनी राजकीय उन्नतीसाठी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि २५ सप्टेंबर १९१६ रोजी होमरूल लीगची मद्रासमध्ये स्थापना केली.
खेडे हा राज्याचाआद्य घटक मानून तेथून जिल्हा, प्रांत व राष्ट्रीय संसदेपर्यंत स्वराज्याची उभारणी करणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. अल्पावधीतच तिच्या शाखा मुंबई, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, मथुरा, कालिकत, अहमदनगर, मद्रास आदी ठिकाणी स्थापन झाल्या. एका देशव्यापी संघटनेचे स्वरूप तिला प्राप्त झाले. ॲनी बेझंट यांनी तत्पूर्वी कॉमनविल या साप्ताहिकात २ जानेवारी १९१४ रोजी धार्मिक स्वातंत्र्य, राष्ट्रीय शिक्षण, सामाजिक व राजकीय सुधारणा ही स्वराज्याची उद्दिष्टे उद्धृत केली होती.
ॲनी बेझंट यांनी आपली दोन पत्रके, भाषणे आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या शाखांद्वारे देशभर लीगचा प्रसार-प्रचार केला. तत्पूर्वीच लोकमान्य टिळकांनी होमरूल लीगची कल्पना १९१४ मध्ये मांडली होती. लोकमान्य टिळकांनी पुणे येथे डिसेंबर १९१५ मध्ये राष्ट्रवादींची( जहालांची) परिषद भरविली. तीत नेमलेल्या समितीने बेळगावच्या परिषदेत २८ एप्रिल १९१६ रोजी इंडियन होमरूल लीगच्या स्थापनेचा ठराव संमत करून जोसेफ बॅप्टिस्टा यांना लीगचे अध्यक्ष नेमले.न. चिं. केळकर सचिव झाले. या दोन्ही संघटनांचे कार्य एकमेकींना पूरक असेच होते.
ब्रिटिश साम्राज्यांतर्गत सनदशीर मार्गांनी लोकजागृती व जनसंघटन हा लीगचा उद्देश होता. लोकमान्य टिळकांनी केसरी-मराठा वृत्तपत्रांतून आणि सभा-संमेलनांतून लीगचा प्रसार केला.
या चळवळीचा वाढता प्रभाव ब्रिटिश सरकारला असह्य झाल्याने १५ जून १९१७ रोजी ॲनी बेझंट यांना मद्रास येथे स्थानबद्ध करण्यात आले. तत्पूर्वी लखनौ येथे झालेल्या १९१६ च्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी लोकमान्य टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-लीग करार झाला व काँग्रेस–लीग संयुक्त अधिवेशन होऊन स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर केला गेला. मवाळांच्या राजकीय हालचालींना होमरूल लीगने पायबंद घातला. ॲनी बेझंट यांना स्थानबद्ध केल्यानंतर लोकमान्य टिळकांवरही राजद्रोहाचा खटला भरण्यात आला पण उच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले.
भारत सचिव माँटेग्यू यांना ॲनी बेझंट यांनी आपल्या लीगतर्फे निवेदन सादर केले. विलायतेस (इंग्लंडला) जाऊन आपले म्हणणे मांडल्याशिवाय कार्यभाग होणार नाही, असे पाहून लोकमान्य टिळकांनी होमरूल लीगतर्फे एक शिष्टमंडळ बॅप्टिस्टांच्या नेतृत्वाखाली १९१७ मध्ये इंग्लंडला पाठविले व स्वतः इंग्लंडला जाण्याचे प्रस्थान ठेवले पण त्यांच्या शिष्टमंडळाची पारपत्रे (पासपोर्ट) रद्द करण्यात आली, तर ॲनी बेझंट यांच्या शिष्टमंडळाला जिब्राल्टरहून भारतात परत पाठविण्यात आले. अमेरिकेतील सिनेटर आणि काँग्रेस प्रतिनिधींनी होमरूल लीगची प्रशंसा करून कॅनडा व ऑस्ट्रेलियासदृश स्वराज्य भारतास द्यावे, असे सुचविले. त्याप्रीत्यर्थ इंडियन होमरूल लीगची शाखा न्यूयॉर्कमध्ये काढली. तिने यंग इंडिया हे नियतकालिक जुलै १९१८ मध्ये काढले. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी लाला लजपत राय, के. डी. शास्त्री, एन्. एस्. हार्डीकर आदी लीग कार्यकर्त्यांना अमेरिकेत पाठविले. त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोला १९१९ मध्ये लीगची शाखा काढली.
जून १९१८ मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात निर्दिष्ट केलेल्या सुधारणांचे ॲनी बेझंट यांनी स्वागत केले. लोकमान्य टिळकांना हे मान्य नव्हते. त्यावरून त्यांच्याशी ॲनी बेझंट यांचे मतभेद झाले. काँग्रेसला स्वयंनिर्णय व संपूर्ण जबाबदारीचे स्वराज्य पाहिजे होते.
भारतातील वाढता असंतोष,होमरुल चळवळीची वाढती लोकप्रियता, युरोपातील युध्दजन्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने भारतीयांना राजकीय अधिकार देण्याचे ठरविले. एका परदेशी महिलेचे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील कार्य वाखानन्यासारखे आहे. डॉ.ॲनी बेझंट यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
✌✌✌✌✌🤟🤟🤟🤟🤟🤙🤙🤙🤙🤙🤙🤙🤙🤙🤙🤙
उत्तर द्याहटवा