शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

!! संगीतकार विष्णु नारायण भातखंडे स्मृतिदिन !! (१९ सप्टेंबर )

 


!!  संगीतकार विष्णु नारायण भातखंडे स्मृतिदिन !!  (१९ सप्टेंबर )

 



विष्णु नारायण भातखंडे जन्म : १० ऑगस्ट १८६० मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६.
हे  हिंदुस्थानी संगीतक्षेत्रातील एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक. जन्म वाळकेश्वर, मुंबई येथे. मूळ गाव कोकणातील नागाव (जि. रायगड). त्यांचे वडील मुंबईतील एका धनिकाच्या जमीनजुमल्याचे कारभारी होते. त्यांना संगीताची आवड होती आणि ते स्वरमंडलही वाजवित असत. त्यामुळे गजानन ऊर्फ विष्णू यांस लहानपणापासून संगीताची गोडी लागली. भातखंडे हे लहानपणीच बासरी वाजविण्यास शिकले. महाविद्यालयात शिकत असताना ते सतारही वाजविण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले. ते एलफिन्स्टन महाविद्यालयातून १८८५ मध्ये बी.ए. व पुढे एल.एल.बी. झाले.
       भातखंडे १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या ‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) दाखल झाले होते. तेथे त्यांना त्या काळातील नामांकित गायक-वादकांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळाली. ही संस्था त्यांच्या व्यासंगाची गंगोत्रीच ठरली व तेथे त्यांच्या संशोधनाला चालनाही मिळाली. ह्या संस्थेत त्यांनी अनेक वर्षे विनावेतन संगीत शिकविले आणि वेगवेगळ्या थोर कलावंतांकडून पारंपरिक धृपदे, ख्याल, होरी, तराणे, ठुमरी यांची माहिती व चिजा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना असे आढळून आले, की गायकांच्या चिजांमध्ये व्यक्त होणाऱ्या रागस्वरूपांचा प्राचीन ग्रंथातील रागविचारांशी व उपपत्तींशी नीट मेळ बसत नाही. शास्त्रीय स्वरलिपिपद्धतीचा प्रचार नसल्याने आणि उपपत्तींचे गायकांना ज्ञान नसल्याने ते पारंपरिक चिजांमध्ये बदल करीत आणि नवीनही चिजा बनवीत. त्यामुळे उपलब्ध रागरागिण्या व चिजा हाच संशोधनाचा व उपपत्तींचा पाया मानून भातखंडे यांनी आपल्या जन्मभर चालविलेल्या संगीतकलेच्या पद्धतशीर अभ्यासाला प्रारंभ केला. गायनोत्तेजक मंडळीच्या नियतकालिक बैठकांमध्ये ते वरील विषयासंबंधी पद्धतशीर विचार मांडू लागले. जुन्या ग्रंथांतील भाषा व विचार अस्पष्ट, संदिग्ध व शंकास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. तद्वतच प्राचीन ग्रंथांतर्गत संगीतशास्त्र व प्रत्यक्ष प्रचलित गानव्यवहार यांतील पूर्ण फारकतही त्यांच्या निदर्शनास आली होतीच. त्यातून संगीतशास्त्राची नव्याने आमूलाग्र फेरमांडणी करणे व प्रचलित संगीतव्यवहाराशी त्याची सांगड घालणे, हे त्यांना अत्यावश्यक वाटू लागले. आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी संगीतसंशोधनाला सर्वस्वी वाहून घेतले. स्वत:वर काटेकोरपणे बंधने घालून केवळ संगीतसंशोधनासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली (१९०४, १९०७ व १९०८-०९). ठिकठिकाणच्या संगीतकेंद्रांना भेटी देऊन तेथील शास्त्रकार व कलावंत ह्यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केल्या. संगीतावरचे दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा शोध घेऊन, त्यांतील तत्त्वविचारांची चिकित्सा केली.  हिंदुस्थानी संगीतातील स्वरलिपिरचना, रागविचार, त्याचे आरोहावरोह, श्रुतिविचार, थाटपद्धती, वादी-संवादी स्वर इ. विषयांसंबंधी तात्त्विक सांगोपांग चर्चा व त्या अनुषंगाने विविध उपपत्ती त्यांनी आपल्या ग्रंथांतून मांडल्या. तसेच एक खास स्वरलिपिपद्धती प्रस्थापित केली. पंडित भातखंडे यांच्या संगीतकार्याची त्रिसूत्री म्हणजे प्राचीन संगीतविद्येचे संशोधन, नव्या संगीतशास्त्राची नव्याने उभारणी आणि ह्या संगीतशास्त्राचा प्रचार व प्रसार होय. त्यासाठी त्यांनी संगीतविद्यालयाची स्थापना केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपली सरकारी संगीतपाठशाळा नव्या पद्धतीने चालवण्यासाठी भातखंडे यांच्या हवाली केली (१९१६). ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांनी त्यांच्या देखरेखीखाली ‘माधव संगीत महाविद्यालय’ नव्याने स्थापन केले (१९१८) आणि मुख्य म्हणजे भातखंडे यांनी लखनौला तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’ याची स्थापना केली (१९२६). या संस्थेचेच रूपांतर पुढे ‘भातखंडे संगीत महाविद्यालया’मध्ये झाले. तसेच या संगीतविद्यालयांसाठी सुसूत्र असा अभ्यासक्रम त्यांनी आखला व त्यानुसार क्रमिक पुस्तकेही तयार केली. संगीतविषयक खुल्या चर्चा व विचारविनिमय यांद्वारे संगीप्रसार व्हावा, म्हणून संगीतपरिषदा भरवण्याची मूळ कल्पनाही त्यांचीच होय. त्यानुसार बडोदे (१९१६), दिल्ली (१९१८), वाराणसी (१९१९) व लखनौ (१९२४ व १९२५) येथे परिषदा भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिवाय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी लक्षणगीतसंग्रहासारख्या ग्रंथरचनाही केल्या. बव्हंशी १९०८ ते १९३३ या कालावधीत त्यांनी आपली ग्रंथरचना केली.
वाळकेश्वर, मुंबई येथे भातखंडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.भातखंडे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...