!! कवी वसंत बापट स्मृतिदिन !!
(१७ सप्टेंबर )
विश्वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट जन्म:२५ जुलै१९२२ मृत्यू: १७ सप्टेंबर २००२ हे मराठी कवी होते.
बापट यांचा जन्म सातारा जिल्ह्यात कराड येथे झाला होता. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगातही होते.
तुरुंगातून सुटल्यावर वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा)' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. दरम्यान, इ.स. १९७४ मध्ये ते मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे प्राध्यापक झाले. ते दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य होते.
लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्न होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते.
पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली.
इ.स. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. इ.स. १९७७ व इ.स. १९९३मध्ये अमेरिकेत आणि इ.स. १९९२ मध्ये आखाती देशांत त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत.
कविवर्य वसंत बापट यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
( देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य - सुंदर मंगलाची नित्य हो आराधना!
ही कवी वसंत बापट यांची प्रार्थना ऐकण्यासाठी आपणास यु ट्यूबची लिंक देत आहे, आपण प्रार्थना ऐकावी.)
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा