!! आचार्य विनोबा भावे जन्मदिन !!
(११ सप्टेंबर )
विनायक नरहरी भावे( आचार्य विनोबा भावे) जन्म: ११ सप्टेंबर १८९५ मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२ हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.
आचार्य विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे गावी झाला होता.त्यांचे मुळ गाव वाई होते.त्यांचे वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरले. गांधीजींचे भाषण ऐकले. त्या भाषणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी गांधीजींशी पत्रव्यवहार केला. नंतर ७ जून १९१६ रोजी गांधीजींची भेट घेतली. तेथेच ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींजींच्याकडून एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना हा त्यांचा जीवनोद्देश होता. दहा महिन्याच्या कालावधीतच वेदांताचे शिक्षण पूर्ण केले.
विनोबा फेब्रुवारी १९१८ मध्ये अहमदाबादला गेले. यावर्षी देशभर इन्फ्लुएन्झाची साथ पसरली होती. या साथीत आई ,वडील व धाकटा भाऊ दत्तात्रय आजारी पडले. लक्षावधी लोक या साथीत बळी पडले.आई व भाऊ या दोघांचेही निधन झाले. ज्येष्ठ पुत्र असल्याने आईवर विनोबांनी विधी करणे अपेक्षित होते. परंतु आईवर पुरोहिताकडून अंत्यविधीचा कोणतीही संस्कार करण्यास विनोबा तयार नव्हते त्यामुळे ते स्मशानभूमीत गेलेच नाहीत.सर्व विधी वडिलांनीच पूर्ण केला.
सन १९२१ साली जमानालाल बजाज यांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्धा येथे सुरु केली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्याला केली. ८ एप्रिल १९२१ ला विनोबा वर्ध्याला पोहोचले.१९५१ ते १९७३ चा भूदान चळवळीचा काळ वगळता विनोबांनी संपूर्ण आयुष्य वर्धा येथेच तपचर्या करत घालवले.
दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले. रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धान्त होता. 'शरीरश्रमनिष्ठा' हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होते. शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी महात्मा गांधीची मूलभूत राजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय-परिवर्तन करू शकतो, अशी गांधींची धारणा होती. २० ऑक्टोबर १९४० रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.
१९३२ सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल बजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी इ. मंडळी उपस्थित असत.
वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पवनार येथील आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. १९३६ पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न विनोबांनी केला.
दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी प्राणत्याग केला. अशा या महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा