गुरुवार, २९ जुलै, २०२१

माळीण गावातील दरड दुर्घटना (३० जुलै )

 


माळीण गावातील दरड दुर्घटना
(३० जुलै )



माळीण गावातील दरड दुर्घटना -३० जुलै २०१४
     पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करणारे मौजे माळीण गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी मंगळवारी रात्री गाढ झोपी गेले होते. परंतु त्याच दिवशी रात्री एवढी अतिवृष्टी झाली की गावातील जीवनच संपुष्टात आले.
       दिनांक ३० जुलै, बुधवारची नुकतीच उजाडू लागलेली सकाळची वेळ, माळीण गावच्या डोंगरात स्फोटकसदृष्य आवाज झाला, मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील ७४ पैकी ४४ घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब!
          माळीण गाव पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक आदिवासी गाव. भिमाशंकर पासून २०कि.मी आणि पुण्यापासून ७५ कि.मी अंतरावर वसलेल्या या गावची ७ वाड्यासहित लोकसंख्या ७१५. मूळ गावामधील ७४ घरांपैकी ४४ घरे, त्यातील १५० ते १६५ पुरूष, स्त्री, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्यासहित मातीच्या ढिगाऱ्याखाली. गावाचे हे दु:खद आणि विदारक चित्र, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
आहुपे - मंचर ही एस.टी. बस रात्री आहुपे मुक्कामी. ही बस सकाळी अतिदुर्गम आदिवासी आहुपे मुक्कामाचे गाव सोडून साडे वाजेपर्यंत कोंढरे घाटापर्यंत पोहचली. तेथे एस.टी चालकाला माळीण गाव दरड कोसळ्याने मातीच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे समजले. माळीण गाव परिसरात मोबाईल - इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने तेथील परिसरातील घडामोडीची देवाणघेवाण करणारी एस.टी बस हीच एकमेव सेवा. एस.टी बस जेथे उभी होती त्या कोंढरे घाटाच्या वरच्या बाजूस मोबाईल रेन्ज असल्याने बसचालकाने त्वरित आपल्या मंचर येथील भावाला, भावाने त्वरित भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यास व कारखान्याने प्रशासनास सदर दुर्घटनेची माहिती पोहचविली.
एकसारखा दमदार पाऊस, अरूंद रस्ता, वाहनांची व बघ्यांची गर्दी व इतर अडचणींना तोंड देत पुण्याहून एनडीआरएफ (National Disaster Response Force) टीम ४०० जवान, डॉक्टर्स, नर्सेससहित माळीण येथे दाखल झाली. अहोरात्र प्रयत्नांती सहाव्या दिवसाखेर १२१ मृतदेह बाहेर काढण्यात आले. सुरूवातीस ९ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले. आणखी ४०-५० मृतदेह मातीच्या ढिगाऱ्यात असण्याची शक्यता. डोंगर कोसळून एवढी मोठी क्षणार्धात झालेली जीवित हानीची राज्यातील ही पहिलीच दुर्घटना. माळीण गाव भूगोलाच्या नकाशावरून कायमचे पुसले गेले.
       माळीणची  पुनरावृत्ती यावर्षी घडली. याच महिन्यात २२ जुलै रोजी सातारा, रायगड,रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली,पालघर या जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला. माळीण सारख्या दुर्घटना अनेक जिल्ह्यात घडल्या. बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सर्व मृतदेह काढता आले नाहीत. अनेक जनावरेही कायमची गाडली गेली. सातारा जिल्ह्यापुरता विचार करायचा म्हटले तरी पाटण ,वाई,जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.रायगड जिल्ह्यात महाड जवळील तळये गावातही दरड कोसळून फार मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात तळये,आंबेघर, मिरगाव, देवरुखवाडी सारख्या घटना घडू नयेत यासाठी शासनाने या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. लोकांनीही प्रशासनास साथ द्यायला हवी.
     आजच्या या दिवसाच्या निमित्ताने माळीणबरोबर राज्यातील दरड दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बंधू भगिनींना विनम्र अभिवादन.
        राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८



1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...