गुरुवार, २४ जून, २०२१

जागतिक पांढरा कोड दिन !! (२५ जून )

 

!! जागतिक पांढरा कोड दिन !! 

     (२५ जून )
   


                   जनजागृतीच्या अभावामुळे रुग्णांची हेटाळणी कोड एक जनुकीय आजार; रंगपेशी नष्ट होण्याचा परिणाम!
             त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणारा आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने २५ जून हा दिन ‘व्हिटिलिगो’ अर्थात जागतिक पांढरे कोड दिन घोषित केला आहे. या दिनी कोड रुग्णांची तपासणी व त्यांना आरोग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पांढरा कोड म्हणजे त्वचेवरील रंग नष्ट होऊन त्वचेचा रंग पांढरा होणे होय. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ म्हणतात. या पेशी काही कारणाने नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यास अडथळे येऊन त्वचेच्या भागात रंग तयार होत नाही. तिथे पांढरा डाग अर्थात कोड निर्माण होतो. अशा डागांचे शरीरावरील स्थान निश्चित नसते. पांढरे डाग कोणत्याही व्यक्तीस होऊ शकतात. अगदी लहान बालकासही कोड होऊ शकतो. तथापि, हा संसर्गजन्य रोग नसून, अशा रुग्णांनी आपली तपासणी अवश्य करावी.
                या रोगाला काही जेनेटिक दोषाची कारणे असू शकतात. या विकारात जनुकामधील त्वचेतील मेलॅनिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात. मेलेनिनमुळे त्वचा व केसांचा रंग ठरत असतो. सुमारे ३० टक्के रुग्णांमध्ये हा रोग आनुवांशिकतेने झाल्याचे आढळून आल्याचे  वैद्यकीय तज्ञाचे मत आहे. कोड हा संसर्गजन्य रोग नसून, कोडाच्या व्यक्तीबरोबर राहिल्यानेही हा रोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोडाचे विविध प्रकार
          पांढऱ्या कोडाचे प्रकार अनेक असून, जर कोडाचे चट्टे संपूर्ण शरीरावर असतील तर त्याला व्हिटिलिगो वल्गारीस असे म्हणतात. फक्त ओठावर, बोटांच्या टोकावर वा गुप्तांगावर चट्टे असतील तर त्याला ‘लीप टीप व्हिटिलिगो’ म्हणतात. एकाच ठिकाणी चट्टा असेल तर त्याला ‘लोकलाइजड व्हिटिलिगो’ म्हणतात. जर चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला ‘अन्स्टेबल व्हिटिलिगो’ म्हणतात. याच्या उपचारात विशिष्ट अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर केला जातो. ही थेरपी अंगात रंग आणण्यासाठी उपयोगी आहे. लहान डागांसाठी लेसर थेरपीचा उपयोग केला जातो. तसेच कोड झालेल्या जागेवर सोरलीन नावाची औषधी लावून उन्हात उभे केले जाते.
पांढऱ्या डागाने खचून जाता कामा नये. मनात न्यूनगंड न ठेवता निरंतर वैद्यकीय उपचार, औषधे, गोळ्या, मलम, त्वचेची लेसर व अन्य शस्त्रक्रियेने हा रोग बरा होऊ शकतो.
-संदर्भ --विदर्भ डर्मेटॉलॉजी सोसायटी, अकोला
संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...