!! वाढदिवस वडाचा !!(१९ मे )
गतवर्षी अभयवन प्रकल्पांतर्गत अंगापूर, धोंडेवाडी, वर्णे,खोजेवाडी,फत्यापुर गावच्या हद्दीत विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड करण्यात आली होती. या वृक्षलगवाडीसाठीचे प्रेरणास्थान होते मा. अशोकराव कणसे (बापू ),ऊर्जा विभागातील एक उच्चपदस्थ अधिकारी आपलं गाव आणि परिसरातील गावातल्या तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण करतो. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने धोंडेवाडी येथील दत्त मंदिर परिसरात वृक्षांची लागवड करतो ही बाब निश्चितच भूषणावह आहे.
बापूंना साथ मिळाली ती सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांची तसेच निवृत्त सैनिक गणेश शेडगे, एनएसजी कमांडो श्रीमंत काळंगे, राहुल काळंगे, कृष्णत घोरपडे, माणिक शेडगे(काका), धोंडेवाडीचे सरपंच नथुराम घाडगे, प्रशांत कणसे सर, या त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांची. या सर्वांबरोबर मला ही संधी मिळाली या तरूणांसोबत थोडफार काम करण्याची. ही तरूणांची ऊर्जाच मलासुध्दा तरूण ठेवते.
सन २०१६ च्या पावसाळ्याच्या सुरुवातीला आबापुरी येथे पायऱ्यांच्या जवळ अगदी पायथ्याला अशोक कणसे, माणिक काका यांनी पाच वृक्षांची लागवड केली होती, त्या वृक्षारोपणाचा मी साक्षीदार आहे. आज त्यावेळी लागवड केलेला एक वृक्ष तग धरुन आहे जणू काही अस्तित्वासाठी संघर्ष करण्याचा संदेश देत आहे. चारपाच वर्षांपूर्वी हा डोंगर हिरवागार करण्याचे स्वप्न बापू तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिलं, ते आता सन २०२०-२१ मध्ये सत्यात आलं. दिवसा स्वप्न बघा आणि ती सत्यात उतरण्यासाठी अविरतपणे कष्ट करा हाच संदेश बापूंनी प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे.
"चला आपण हा डोंगर हिरवागार करुया". गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊन काळात मुलांनी डोंगरावर खड्डे काढले, रोपांची लागवड केली.त्याला खत, पाणी दिले. आज हे सर्व वृक्ष आनंदाने डोलताना दिसत आहेत. एका वर्षात बरेचसे चित्र बदलले. नुकतच बापूंनी पुढाकार घेऊन डोंगरावरील सर्व झाडांना पाणी मिळेल अशी व्यवस्था आपल्या साथीदारांच्या मदतीने केली. सध्या या डोंगरात अनेक सरपटणारे प्राणी आढळून येतात. रानडुक्कर, हरीण, तरस, कोल्हा, ससे दृष्टीस पडतात.डोंगरावर अनेक ठिकाणी पाणवठे निर्माण केल्यामुळे पशुपक्षी,प्राणी यांची तहान भागत आहे. जैवविविधता जपली जात आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.
आज १९ मे, गतवर्षी अंगापूरच्या हद्दीत असाच एक देशी वटवृक्ष लावला, खरं तर त्याचा आज पहिला वाढदिवस. हा वटवृक्ष आमच्या सर्वांचा लाडका बनला आहे. वर्षभर त्याची सेवा प्रत्येकाने केली आहे. कोरोनामुळे आपणास ऑक्सिजनचे महत्व समजले. भविष्यातील पिढ्याना चांगले आरोग्यदायी जीवन मिळण्यासाठी वृक्षांचा रोल खूप महत्वाचा आहे. खर तर जन्मापासून अंतापर्यंत वृक्ष आपणास साथ देतात. वृक्षांना आपण देव मानतो, त्यांची पूजा करतो आणि कधी कधी आपल्या स्वार्थासाठी त्याच्यावर कुराड चालवतो. वडाच्या झाडाला आपल्या जीवनात खूप महत्व आहे. त्याची शास्त्रीय माहिती आपणापर्यंत पोहचली पाहिजे यासाठी ती खाली देत आहे
वड : वटवृक्ष : शास्त्रीय नाव: फायकस बेंगालेन्सिस ; इंग्लिश: banyan, बन्यान हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हेे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसले म्हणुन बेंगालेन्सिस, तर बंगालीत व्यापा-याला बनीया म्हणतात म्हणुन बन्यान ट्री असे इंग्रजीत नाव आहे .
भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे हे गाव आपणास माहिती असेलच, तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड एकर परिसरात पसरलेला आहे.
आपण सर्वजणच धरणीमातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आहे त्या वृक्षांचे जतन करुया, नवीन वृक्ष लागवड करुया. ही धरतीमाता हिरवीगार होण्यासाठी प्रयत्न करुया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
छानच..असेच सर्वांनी आनुकरण करणे आवश्यक करणे
उत्तर द्याहटवाखूपच छान माहिती. धन्यवाद
उत्तर द्याहटवा