!! अक्षय्य तृतीया !!(१४ मे)
भारतीय संस्कृतीतील महत्वाचा दिवस, साडे-तीन मुहूर्तांपैकी एक
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.
ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे.
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.
परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते'.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे.
या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करणे.
ब्राह्मण भोजन घालणे.या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खाणे.या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा