!! जागतिक आरोग्य दिन !!(७ एप्रिल)
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने स्वच्छतेतून आरोग्याकडे
७ एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थापन झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेमध्ये जगातील जवळजवळ १९२ देश सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीत जास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे, हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे.
संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरील उपाय यावरच मर्यादित न राहता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. नवीन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादी कामे या संघटनेमार्फत केली जातात. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाटय़, फिल्म्स, प्रसारमाध्यमे आदीमार्फत त्या विषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत एक घोषवाक्य निवडण्यात येते, ज्याचा प्रचार व प्रसार जागतिक स्तरावर सर्वत्र करण्यात येतो. सन २०१९ वर्षात जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य ” Universal Health Coverage : Every One, Every Where” म्हणजेच ‘‘ आरोग्य सेवेची उपलब्धता – प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी’’ हे होते.
सन २०२० या वर्षाचे आरोग्यदिनाचे घोष वाक्य-परिचारिका आणि दाईना आधार(Support Nurse's and Midwives) जगभरातील रुग्णालयात कोरोनाशी मुकाबला डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेविका आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून ही थीम ठेवण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य सेवा सर्वाना सर्वत्र उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे. शासनाच्या माध्यमातून आज अनेक आरोग्य सेवा व योजना गरीब, गरजू लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर योजनांची व्यापक प्रसिद्धी व प्रचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या आरोग्य सेवा पोहोचतील. लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्म घेत असून त्यांवरील उपचार पद्धती व खर्चाची व्याप्तीदेखील वाढत आहे. आपल्या घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्तिक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्येकाने करणे व त्यायोगे ‘‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’’ ही संकल्पना मूर्तरूपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणा-या रोगांमुळे पीडित असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्वच्छतेतून लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्या योजनांमध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटविण्यात येत आहे.
आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उद्यान, रस्ते या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थाची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचका-यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नद्या व नाले या सांडपाणी वाहून नेणा-या गटारी बनल्या आहेत. कच-याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्टी करता येतात. आजकाल जागोजागी पसरलेल्या कच-यामध्ये सर्वात मोठय़ा प्रमाणावर दिसणारा घटक म्हणजे प्लॅस्टिक. एकतर प्लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्लॅस्टिकचा कचरा आरोग्यासाठी खूप घातक आहे.
त्यामुळे आपण सर्वानी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकचे आवरण असलेले खाद्यपदार्थ वापरणे बंद करायला हवे तसेच प्लॅस्टिकचे विघटनदेखील योग्य मार्गाने करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील कच-याची योग्य त्या ठिकाणी ओला – सुका वर्गीकरण करून विल्हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्हा परिसराची स्वच्छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्यासाठी प्रवृत्त करायला हवे. केंद्र शासनाने आणलेली स्वच्छ भारत संकल्पना देशाला अधिक समृद्ध व सुंदर बनवणारी असून यासाठी आपला सर्वाचाच सहभाग अत्यंत मोलाचा आहे.
गेल्यावर्षापासून कोरोना - कोव्हीड १९ ने जगभर थैमान घातले आहे. सध्या आपल्या राज्यात लॉकडाउन चालू आहे. महाराष्ट्राची स्थिती गंभीरच आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी योग्य निर्णय घेतले आहेत तरीही आपण ही साथ आटोक्यात आणू शकलो नाही असे वाटते.लोकांना गांभीर्य वाटत नाही, नियमांचे पालन होत नाही. प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नाही. उदा. मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे.वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे ,लस घेणे इत्यादी.
सातारा जिल्ह्यापुरता विचार करावयाचा झाला तर जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजय बन्सल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण,जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, या सगळ्यांच्याबरोबर सर्व डॉक्टर, नर्स,आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर, पोलीस प्रशासन यांचे काम खूपच उल्लेखनीय आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी आपण "घरात राहूया आणि कोरोनाला हरवूया" प्रशासनाला सहकार्य करुया. संपूर्ण जगाला कोरोनाचा फटका बसला आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन या जागतिक समस्येला तोंड देऊया.
जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
उत्तर द्याहटवाखूप सुंदर 👌
उत्तर द्याहटवा