सोमवार, ८ मार्च, २०२१

महाराष्ट्र कवी यशवंत जन्मदिन !! (९ मार्च )

 !! महाराष्ट्र कवी यशवंत जन्मदिन !!

  (९ मार्च )



    महाराष्ट्र कवी उर्फ यशवंत दिनकर पेंढारकर जन्म:९ मार्च १८९९ मृत्यू : २६

 नोव्हेंबर १९८५

            आई! म्हणोनी कोणी। आईस हाक मारी।

ती हाक येई कानी। मज होय शोक कारी।

या महाराष्ट्र कवी यशवंत उर्फ यशवंत दिनकर पेंढारकर यांच्या आई कवितेतल्या प्रारंभीच्या ओळी. जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली ही कविता म्हणजे मराठी साहित्याचे, कविता विश्‍वाचे अजरामर लेणे ठरले आहे. कवी यशवंतांची आई, माधव ज्युलियन यांची प्रेम स्वरुप आई या कविता आणि साने गुरुजींच्या श्यामची आई या मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्राने मराठी साहित्य विश्‍वात अढळस्थान मिळवले आहे. आई म्हणोनी कोणी ही कविता म्हणजे भावनांचा उत्कट आणि उत्स्फूर्त आविष्कार, आईच्या आभाळ मायेला घातलेली आर्त हाक. ही कविता ऐकताना डोळे पाणावतात आणि आईच्या अपार मायेचा गहिवर येतो. मराठी कवितेच्या विश्‍वातला ध्रुवतारा म्हणजे कवी यशवंतांची ही कविता. याच कवितेत त्यांनी  स्वामी तिन्ही जगाचा। आई विना भिकारी।

अशा शब्दात आईच्या अथांग मायेची महती सांगितली आहे.

या महाकविची ९ मार्च २०२१ (आज) १२२ वी जयंती. गेली १०० वर्षे पाच पिढ्यांवर आई या कवितेचे गारूड घालणार्‍या या कविचा जन्म समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या चाफळ येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. बालपणीच समर्थ रामदास आणि छ. शिवरायांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांचे संस्कार यशवंत यांच्यावर झाले. बालवयातच वडिलांचे निधन झाल्याने सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून ते व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झाले. सरकारी शिक्षण खात्यात प्रारंभी अलिबागला आणि नंतर पुण्याच्या शाळेत त्यांनी नोकरी केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मुदतीआधीच सेवानिवृत्त झाले. सांगलीच्या वास्तव्यात शिक्षक कवी साधूदास-गो. गो. मुजुमदार यांच्या प्रेरणेने त्यांच्या कवितेचा प्रवास सुरु झाला. प्रतिभेचे ईश्‍वरदत्त देणे लाभलेले यशवंत मराठी कवितेला नवी दिशा देणार्‍या रविकिरण मंडळाचे सदस्य होते. माधव ज्युलियन, गिरीश, वि. द. घाटे या रविकिरण मंडळाच्या सप्तर्षीतला हा तेेजोमय तारा होता. रविकिरण मंडळाच्या कवींनी मराठीच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिसाहात दिलेले मोलाचे योगदान, मराठी साहित्याचा प्रवाह समृध्द करणारे ठरले आहे.

         रविकिरण मंडळाच्या कवींनी त्या काळातच महाराष्ट्रभर मराठी कवितांचे कार्यक्रम करून रसिकांना मराठी कवितेची गोडी लावली होती. त्यांचे यशवंत, वीणाझंकार, भावमंथन, यशोगंधा, यशोनिधी, यशोगिरी, पाणपोई, वाकळ यासह २१ कविता संग्रह प्रसिध्द झाले आहेत. कवी यशवंत यांच्या कवितेत अभिजातवाद, वास्तववाद, सौंदर्यवादाच्या संगमाबरोबरच भावभावना, माया, दु:ख, व्यथा, वेदना, राष्ट्रभक्ती यासह मानवी स्वभावाचे दर्शन घडते. जीवनादर्शी भावनांचा उत्कट प्रकटीकरण आणि कारुण्याचा झरा म्हणजे कवी यशवंतांची कविता! त्यांनी कवितेशी कधीही प्रतारणा केली नाही. कविता हा त्यांच्या जीवनाचा श्‍वास आणि ध्यास होता. बडोदा संस्थानने १९४० मध्ये राजकवि या सन्मानाने त्यांचा गौरव केला होता. १९५० मध्ये मुंबईत झालेल्या ३३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिकेचे संपादकही होते. मराठी साहित्य शास्त्र आणि समीक्षेवर त्यांनी लिहिलेली पुस्तके, मराठी साहित्याच्या अभ्यासकांना मराठी साहित्याच्या समृध्द विश्‍वाची प्रचिती घडवणारे आहेत. समर्थ रामदास यासह त्यांचे १३ ग्रंथ प्रसिध्द झाले आहेत. बंदिशाळा आणि जय मंगल ही दोन खंडकाव्ये लिहिणार्‍या याच महाकवीने जीवनाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवराय हे खंडकाव्य लिहिले होते. कवी यशवंतांच्या कविता म्हणजे मराठी साहित्यातले सर्वार्थाने यशवंतपर्व होते. १९६१ मध्ये केंद्र सरकारने पद्मभूषण किताबाने त्यांना सन्मानित केले होते. तर, महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर राज्य सरकारने या महाकवीला दरमहा पाचशे रुपये मानधन देवून सन्मानित केले होते.

       कवी यशवंत यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

    संकलक : राजेंद्र पवार

      ९८५०७८११७८

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...