शनिवार, २७ मार्च, २०२१

!! होळी सण माहिती !! (२८ मार्च )

 


         !!  होळी सण माहिती  !!
(२८ मार्च )




         होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तसेच काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो . फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
                    होळी साजरी करताना लोक ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग,फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.
          महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ आहे. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
            भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
              विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पातळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विविध विधानांची भर पडली असावी.
                    पुरणपोळी
महाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.तसेच समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजन करतो.होळी समोर गार्‍हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे.
    कोरोना प्रादुर्भावामुळे,होळी,धुलीवंदन व रंगपंचमी हे उत्सव  अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. आपण सर्वजण आदेशाचे पालन करुया व हे सण साधेपणाने साजरे करुया.
  संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...