गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

! महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन !! (२८ नोव्हेंबर )

 

!!    महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन !!  (२८ नोव्हेंबर )



          महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते.
        महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी "सत्यशोधक समाज" नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती.  महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या ‘The Right Of Man’ या पुस्तकाचा प्रभाव होता.
              महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य
     ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
         १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत मुलीची दुसरी शाळा सुरु केली.
        १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
      १८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली.
           १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली.
     १८६३ मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली.
     १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.
      १८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन परंपरागत रुढींना धक्का दिला.
      ‘शेतकऱ्यांचा आसूड‘ या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी समाजाची स्थिती पुढीलप्रमाणे शब्दबद्ध केली.
                 विद्येविना मती गेली;
                  मतीविना नीती गेली;
                  नीतीविना गती गेली;
                   गतीविना वित्त गेले;
                   वित्ताविना शूद्र खचले;
                 इतके अनर्थ एका अविद्येने केले. 
  यातच त्यांनी शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे तलाव, विहिरी यासारखे उपाय सुचवले.
          २४ सष्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
                १८८० मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्‍नाची वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या माध्यमातून बॉम्बे मिल असोसिअशन या संघटनेची स्थापना केली.
        इ.स. १८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या (ड्यूक ऑफ कॅनॉट) कार्यक्रमात त्यांनी ‘शेतकऱ्यांचा प्रतिनिधी’ म्हणून पारंपरिक वेशात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले.
            महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली. यामुळेच जनतेने त्यांना १८८८ साली महात्मा ही पदवी दिली.
         महात्मा फुले यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

४ टिप्पण्या:

  1. Very nice post. Mahatma Phule also served in the capacity of Pune's municipal commissioner from 1876-1882. One of the lesser known facts is that he ran a successful construction and metal supply business. He used the income from such commercial activity to sponsor his social initiatives. He provided education to all his construction labour and their families. Truly a Mahatma!

    उत्तर द्याहटवा
  2. महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिव जयंती साजरी केली. अश्या या क्रांतिकारी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन

    उत्तर द्याहटवा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...