!! पांडुरंग शास्त्री आठवले जन्मदिन !!
(१९ ऑक्टोबर )
पांडुरंग शास्त्री आठवले जन्म : १९ ऑक्टोबर १९२० मृत्यू : २५ऑक्टोबर २००३ पांडुरंग शास्त्री आठवले "दादाजी" म्हणून सर्वत्र परिचित आहेत. ते समाज क्रांतिकारक, आध्यात्मिक शिक्षक, आध्यात्मिक नेते, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते असून , या परिवाराचे दहा लाखापेक्षा जास्त अनुयायी आहेत. गेले वर्षभर पांडुरंग शास्त्री आठवले यांचे जन्मशताब्दी वर्ष विविध कार्यक्रमांनी साजरे केले गेले.
पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील रोहा येथे ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आठवले बारा वर्षाचे असताना त्यांच्या आजोबांनी लहान मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची निर्मिती केली होती. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे धडे त्यांना घरीच मिळाले. त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्यांनी भगवद्गीता तसेच वैदिक धर्माचा प्रसार जपान, अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात देखील केला.
१९५४ मध्ये जपानमध्ये झालेल्या विश्व तत्वज्ञान परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादांनी जगातल्या तत्वचिंतकासमोर भारतीय संस्कृती व भगवान योगेश्वर श्रीकृष्णाचे विचार मांडले. अवतारवाद हा विषय स्पष्ट करताना अर्थकारण, राजकारण, शिक्षण, समाजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म व वैश्विक जीवन अशा विविध क्षेत्रात श्रीकृष्णाचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे. दादांच्या मुखातून निघालेल्या ज्ञानतीर्थाने सर्व उपस्थित मंत्रमुग्ध व प्रभावित झाले.
स्वाध्याय परिवारासाठी दर रविवारी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मनाचे शुद्धीकरण करणारी प्रात: प्रार्थना, सांयप्रार्थना गायल्या जातात, व्हिडीओ रेकॉर्डिंग ऐकवले जाते. यामुळे व्यक्ती, कुटुंब व समाज जीवनातील प्रदूषण कमी होत आहे.
स्वाध्याय म्हणजे " स्व "चा अभ्यास, स्वतःच्या शरीरात असलेला "स्व "म्हणजे चैतन्य तत्व त्याला ओळखणे व दुसऱ्याच्या स्वबद्दल आदर बाळगून त्याचा अभ्यास करणे. विवेक, प्रकाश व जीवननिष्ठा म्हणजे स्वाध्याय. परिवाराचे सदस्य स्वतःला " स्वाध्यायी " म्हणवून
घेतात. वर्षानुवर्षे परिवारातील सदस्यांनी भगवद्गीतेच्या देव, धर्माच्या संकल्पना कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. परिवाराच्या माध्यमातून जाती, धर्म ,सामाजिक, आर्थिक अडथळे कधीच ओलांडले आहेत. स्वाध्याय परिवारातील अनुयायी घरोघरी जावून गीतेचे विचार सामान्य लोकांना पटवून देतात. आपल्या देशाबरोबर साधारण ३५ देशात स्वाध्याय परिवाराचे काम चालते. जागतिक पातळीवर समस्यांचे निराकरण करणे, विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणे यासाठी परिवारातील सदस्य झटत असतात. आपला धर्म न सोडता भक्ती करता येते, हे स्वाध्यायाने सिध्द केले आहे. येथे सर्वधर्मसमभावाचा स्वीकार केलेला आहे. या परिवारात मुस्लिम तसेच ख्रिश्चन धर्माचेदेखील अनुयायी आहेत.
या अलौकिक कार्यामुळे पांडुरंग शास्त्री आठवले यांना पद्मविभूषण, टेम्पलटन पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, राष्ट्रीय एकता पुरस्कार आदि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा जन्मदिन मनुष्य गौरवदिन म्हणून साजरा केला जातो.
पांडुरंग शास्त्री आठवले यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा